Travel Places Of Marathwada In Marathi मराठवाड्यात फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे
मराठवाडा म्हणलं की आठवतो, कोरडा दुष्काळ, रखरखीत ऊन, विरळ झाडं आणि पाण्याची टंचाई. मराठवाड्यात काय फिरणार? इथं मंदिरांखेरीज आहे तरी काय बघायला? असा विचार करत असाल तर थांबा… आपला हाच दुष्काळी मराठवाडा पावसाळ्यात काही प्रमाणात फुलतो बरं का! म्हणजे त्या लोणावळा महाबळेश्वर एवढा निसर्ग आपल्यावर मेहेरबान नाही, तिकडे असलेले डोंगर दऱ्या, घनदाट जंगलं इत्यादी आपल्या नशिबात नसलं तरी पण मराठवाड्यातली काही ठिकाणं त्या तोडीची नक्कीच आहेत. चला तर जाणून घेऊयात, पावसाळ्यात फुलणारं मराठवाड्याचं हे सौंदर्य नक्की आहे तरी कुठे.
मराठवाड्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छ. संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, परभणी, हिंगोली या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांत बरीच लहान मोठी पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे आपल्याला बघायला मिळतात.
सुरुवातीपासूनच इथल्या स्थानिक नेत्यांनी इथे कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे जिथे सामान्य सुख सोयी मिळण्याचीच भ्रांत आहे तिथे निसर्ग पर्यटन वगैरे गोष्टी तर दूरच. सोबतच निसर्ग संवर्धन करण्यात मराठवाड्याची जनता देखील तेवढीच उदासीन. त्यामुळे इथे निसर्ग पर्यटन काही म्हणावं तसं फुललं नाही.
Travel Places Of Marathwada In Marathi
पण आम्ही तुम्हाला सांगतोय की मराठवाड्यात देखील अशी काही पर्यटन स्थळं आहे जी फिरण्यासाठी एकदम भारी आहेत.
१)अजिंठा आणि वेरूळ Ajanta and Ellora Caves
मराठवाडा म्हणलं की, राजधानी छ. संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) असणाऱ्या अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा उल्लेख येतोच. संभाजीनगरला (औरंगाबाद) लेण्यांचा जिल्हा म्हटलं जातं. या दोन्ही ठिकाणांना १९८३ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा लाभलाय.
वर्षभरात या दोन्ही लेण्यांना स्थानिक आणि परदेशी मिळून दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात अशी इथे नोंद आहे.
अजिंठ्यात एकूण २९ लेण्या आहेत. या सर्व लेण्या विशेषतः बौद्ध धर्मातील हीनयान व महायान पंथीयांची असून इथे लेण्यांत गौतम बुद्धांचे जीवनप्रसंग देखील कोरले आहेत.
१९५१ मध्ये भारत सरकारद्वारे वेरूळच्या लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले गेले. तर वेरूळचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे हिंदू, बौद्ध व जैन लेणी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात कोरलेले आपल्याला बघायला मिळतात.
पावसाळ्यात या लेणींना भेट देण्याचा फायदा म्हणजे पावसाळ्यात अजिंठा लेण्यांच्या सभोवतालचा निसर्ग हिरवाईने नटुन जातो. तसेच या ठिकाणचे खास आकर्षण असलेला ‘सप्तकुंड’ धबधबा भरून कोसळत असतो. छोट्या छोट्या कुंडामधून वाहत रौद्ररूप धारण करत हा धबधबा खालच्या प्रवाहात कोसळतो.
तसेच वेरूळ इथल्या लेणीच्या माथ्यावरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
Travel Places Of Marathwada In Marathi
वेरूळ-अंजिठ्याला कसं जायचं?
अजिंठा लेणी ही छ. संभाजीनगर (औरंगाबाद) शहरापासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोयगाव तालुक्यात आहे. तर वेरूळ लेणी ही शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे तसेच एसटीने औरंगाबादपर्यंत जाऊन पुढे बसने आपण या लेण्यांना भेट देऊ शकतो.
२)नाथसागर, पैठण Nathsagar
नाथसागर या नावाने परिचित असलेले जायकवाडी धरण छ. संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीवर बांधलेले धरण आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती या जायकवाडी धरणाची आहे.
या धरणाचं बांधकाम १९६५ ते १९७६ असं जवळपास ११ वर्ष चाललं होतं.
या नाथसागर धरणावर मराठवाड्यातील तब्बल ५ जिल्हे अवलंबून आहेत. छ. संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना धरणाचे पाणी जाते. म्हणुनच या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र असे देखील म्हटले जाते.
या ठिकाणची आणखी एक ओळख म्हणजे रंगी-बेरंगी पक्षांचं आश्रयस्थान असलेलं जायकवाडी पक्षी अभयारण्य. देश-विदेशातुन हजारो किलोमीटरचा प्रवास करत ३०० हून अधिक प्रजातीचे पक्षी या पक्षी अभयारण्यात येतात.
Travel Places Of Marathwada In Marathi
यासोबतच पैठण हे संत एकनाथ महाराज यांचे जन्मस्थान आहे. त्यांची समाधी इथेच आहे. वारकरी तसेच महानुभाव पंथाचे लोक पैठणला भेट देतात. तसेच पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान आहे, जिथे जगप्रसिद्ध पैठणी, हिमरू शाली देखील मिळतात.
पैठण आणि नाथसागरला कसं जायचं?
नाथसागर आणि पैठणला जाण्यासाठी छ. संभाजीनगरपर्यंत (औरंगाबाद) रेल्वे आणि बसेसची सुविधा आहे. संभाजीनगर शहरापासून पैठण ८० किलोमीटर अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी संभाजीनगरमधून खाजगी गाड्या आणि लक्झरी बसेस उपलब्ध आहेत.
Travel Places Of Marathwada In Marathi
३)म्हैसमाळ, छ. संभाजीनगर Mhaismal (Best Travel Place Of Sambhajinagar)
म्हैसमाळ हे छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. म्हैसमाळ पावसाळ्यात हिरवाईने नटुन जाते. त्यामुळे पावसाळ्यात म्हैसमाळ पर्यटकांना आकर्षित करते.
खुलताबादपासून सुमारे १२ किमी आणि संभाजीनगर शहरापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे. वाटेत वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि देवगिरी किल्ला आहे.
म्हैसमाळला मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. म्हैसमाळ हा सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडचा भाग असुन इथे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. विविध प्रजातीच्या वनस्पती तसेच फुलं इथे बघायला मिळतात. या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी इथे असलेल्या वनस्पती कार्यशाळेला नक्की भेट द्या.
पावसाळ्यात तर येथील डोंगर- दऱ्यांमध्ये पसरलेला हिरवागार निसर्ग आणि सगळीकडे पसरलेले ढग डोळ्यांचे पारणे फेडतात. वर्षभरात इथले किमान तापमान साधारणपणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत असतं.
म्हैसमाळ हे शंकराच्या पुरातन मंदिराच्या अवशेषाचेही ठिकाण आहे. पूर्वीचे महेशमाळ असं असलेलं नाव नंतर अपभ्रंश होत म्हैसमाळ असं झालं. इथल्या पठारावर गिरजा देवीचे मंदीर व बालाजी मंदीर आहे. इथून घृष्णेश्वर मंदीर अवघ्या १४ किमी अंतरावर आहे तर खुलताबादेतील भद्रा मारोती मंदीर १२ किमी अंतरावर आहे. Travel Places Of Marathwada In Marathi
म्हैसमाळला कसं जायचं?
छ. संभाजीनगर पासुन (औरंगाबाद) म्हैसमाळ ४० किमी अंतरावर आहे. त्यासाठी संभाजीनगर पासुन खुलताबाद मार्गे म्हैसमाळ असा मार्ग आहे.
४)सहस्त्रकुंड धबधबा, नांदेड Sahasrakund Waterfall.
Place To Visit Nanded Tourism In Marathi
नांदेड जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. नांदेडपासून १00 कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ’इस्लामपूर पाटी’ पासून ५ किमी तर किनवटपासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे. या धबधब्याचं वैशिष्टय म्हणजे धबधब्याच्या अलीकडे मराठवाड्याची जमीन आणि धबधब्याच्या पलीकडे विदर्भाची जमीन आहे. त्यामुळे धबधब्याचा अलीकडचा भाग किनवट तर पलीकडचा भाग उमरखेड तालुक्यात येतो.
नांदेड जिल्हा कर्नाटक आणि तेलंगणा अशा दोन राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून देखील पर्यटक येत असतात.
सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर असलेलं पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच काठावर असणारा सुंदर बगीचा, येथील जंगल, वन्य प्राणी आणि विविध प्रजातींची फुलपाखरे देखील पाहायला पर्यटक गर्दी करतात. पण म्हणावा तसा विकास न झाल्यामुळे हा भाग अजूनही सुख सुविधांपासून वंचित आहे.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं माहुरच्या रेणुकामातेचं मंदिर इथून ७० किमी अंतरावर आहे.
सहस्रकुंड धबधब्याला कसं जायचं?
नांदेडहून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर हे सहस्त्रकुंड स्टेशन आहे. स्टेशनपासून फक्त ५ किमी अंतरावर सहस्त्रकुंड धबधबा आहे. स्टेशनपासुन इथे जाण्यासाठी ऑटो-रिक्षा उपलब्ध असतात.
Travel Places Of Marathwada In Marathi
५)सौताडा धबधबा, बीड Sautada Waterfall (Best Travel Location Of Beed)
सौताडा हे गाव बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ भागात उगम पावणारी विंचरणा नदी पुढे वाहत जाऊन सौताडा येथे सुमारे २५० फुट उंचीवरून दरीत कोसळते. याच दरीत भगवान श्रीराम आणि सीता यांनी महादेवाचे ‘रामेश्वर’ मंदिर बनवले अशी आख्यायिका आहे. पावसाळ्यात इथला धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.
पावसाळ्यात सौताडा इथे या महाकाय दरीत जमलेले ढग आणि बाजूलाच कोसळत असणारा विशाल धबधबा पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. सोबतीला महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आपल्याला आकर्षित करते. दरीच्या वर गाड्या लावून खाली पायऱ्यांनी दोन बाजूंनी उतरू शकतो
मराठवाड्यात राहूनही जर महाबळेश्वर, लोणावळा यांचा आनंद घ्यायचा असेल तर सौताडा एक उत्तम ठिकाण आहे.
सौताडा धबधब्याला कसं जायचं?
सौताडा गाव अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. इथे जाण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन अहमदनगर आहे. नगर जिल्ह्यातल्या जामखेड या तालुक्याच्या शहरापासून सौताडा १२ किमी, पाटोदा पासुन १५ किमी तर बीड शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. नगरवरून जामखेड मार्गे जात पुढे सौताडा इथे एसटी बसने जाता येते. किंवा बीड अथवा पाटोदा शहराकडूनही इथे एसटी बस अथवा खाजगी गाडीने जाता येते.
Travel Places Of Marathwada In Marathi
६)कपिलधार धबधबा, बीड Kapildhar Waterfall, Beed. Best Travel Place Of Beed
सौताडाच्या पाठोपाठ कपिलधार हे बीड जिल्ह्यातील दुसरे निसर्गरम्य सुंदर ठिकाण आहे. सौताडा इथे ज्याप्रमाणे दरीत महादेव मंदिर आणि धबधबा आहे तसाच कपिलधार इथे एका मोठ्या दरीत मन्मथस्वामी यांचे मंदिर आहे.
बीड शहराच्या दक्षिणेस १९ किमीवर मांजरसुंभा व तेथून दोन किमी अंतरावर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे. मांजरसुभा हे गाव बीड तालुक्यात येते. कपीलधार हे तीर्थक्षेत्र वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असुन या ठिकाणी मन्मथस्वामी महाराज यांची संजीवन समाधी आहे.
पावसाळ्यात इथले नदी नाले ओसंडून वाहू लागतात तर इथे मंदिराच्या मागील बाजूस असणारा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागतो. इथले निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात इथे आजूबाजूच्या जिल्ह्यातून पर्यटक आणि भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पर्यटन विभागाचा ‘ब’ दर्जा कपिलधारला प्राप्त झाला आहे. कपिलधारला निसर्गानं भरभरून दिलेलं आहे. इथे आल्यावर सह्याद्रीतल्या सुंदर ठिकाणांची आठवण येईल इतका सुंदर हा परिसर आहे. Travel Places Of Marathwada In Marathi
इथे मंदिर दरीत असल्यामुळे मोबाईलला रेंज नसते. मंदिराच्या पुढे धार्मिक आणि स्टेशनरी साहित्य विकणारी दुकानं आहेत तसेच छोटी हॉटेल्स देखील आहेत. कार्तिकी पौर्णिमेला इथे धार्मिक उत्सव असतो तर श्रावण महिन्यातील सोमवारी इथे गर्दी असते.
निसर्ग सुंदर असला तरी सरकारी उदासीनतेमुळे या भागात म्हणावा तसा विकास आणि निसर्ग संवर्धन झालेलं दिसुन येत नाही.
कपिलधारला कसं जायचं?
कपिलधार देवस्थान हे धुळे सोलापूर राज्य महामार्गावर मांजरसुंबाच्या घाटाच्या प्रारंभास आहे. मांजरसुंबा इथून खाजगी वाहनाने इथे जाता येते. बीड सोलापूर महामार्गावर बीड पासुन १९ किमी अंतरावर कपिलधार आहे.
हेही वाचा-लातूर मधल्या अपरिचित लेणी- खरोसा लेणी लातूर
तर ही झाली मराठवाड्यातील पर्यटन स्थळांची यादी. याशिवाय मराठवाड्यात छोटी मोठी पर्यटन स्थळे आहेत. पण सरकारचे दुर्लक्ष, बेजबाबदार राजकारणी आणि नागरिक यामुळे ही ठिकाणं प्रकाशझोतात येत नाहीत आणि इथला म्हणावा तसा विकास होत नाही. Travel Places Of Marathwada In Marathi