भारतातल्या रहस्यमयी जागा Mysterious Places Of India In Marathi
भारत हा एक विविधतेने भरलेला देश आहे, जिथे प्राचीन इतिहास, संस्कृती, भूगोल आदि गोष्टीत मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. अनेक ठिकाणच्या लोकांच्या राहणीमानात बराच मोठा फरक आढळतो. विविध जागा, तिथले लोक आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेल्या काही रहस्यमयी जागा, कथा आपण नेहमी ऐकतो, वाचतोच. अशा रहस्यकथांचा आपण लोक नेहमीच चवीने आनंद घेत असतो. आज आपण भारतातील अशाच काही जागांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याबद्दल अशाच रहस्यकथा प्रसिद्ध आहेत. आपण ज्या जागांबद्दल माहिती घेणार आहोत तिथे पर्यटकांना भेट देण्याची परवानगी आहे पण काही ठिकाणी नियमांचे पालन करावे लागते.
१)कोंग्का ला दर्रा, लडाख (Kongka La Pass) परग्रहवासीयांच्या हालचाली??
कोंग्का ला दर्रा हे भारत-चीन सीमेवरील एक रहस्यमय ठिकाण आहे. हा दर्रा लडाखमध्ये असून तो अत्यंत दुर्गम आणि निर्जन आहे. या ठिकाणी अनेकदा यूएफओ (UFO) पाहिल्याच्या अहवालांमुळे ते जास्तच रहस्यमय बनले आहे. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की या भागात जमिनीखाली एलियन्सचे तळ आहेत. भारतीय आणि चिनी सैन्यदलांनीही या भागातील अशा विचित्र घटनांची नोंद घेतली आहे. या ठिकाणी विज्ञान आणि रहस्यवाद यांची गुंतागुंत आहे. खऱ्या खोट्या गोष्टी काय आहेत ते कोणालाही माहिती नसले तरी या ठिकाणाबद्दल बऱ्याच अफवा या भागात पसरलेल्या आहेत.
२)रूपकुंड तलाव, उत्तराखंड (Roopkund Lake) मानवी सांगाड्यांचा तलाव
रूपकुंड तलाव, ज्याला ‘कंकाल तलाव’ म्हणूनही ओळखले जाते, हे उत्तराखंडमधील एक रहस्यमय ठिकाण आहे. हिमालयात उत्तराखंडमध्ये ५००० मीटर उंचीवर हे एक छोटे कुंड आहे. सन १९४२ साली लष्कराच्या एका जवानाला इथून जात असताना जे दृश्य दिसलं ते थरकाप उडवणारं होतं. या कुंडाजवळ ६०० ते ८०० मानवी सांगाडे पडलेले होते. तेव्हापासून वैज्ञानिक इथे काय घडलं असावं याचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यानुसार इथले सांगाडे सुमारे १२०० वर्षांपूर्वीचे आहेत.
वर्षभर जेव्हा हा तलाव बर्फाने झाकलेला असतो तेव्हा तर परिस्थिती साधारण असते पण उष्णतेमुळे जेव्हा बर्फ विरघळून पाणी होऊ लागतो ते ही मानवी हाडे उघडी पडतात. आणि सगळीकडे हाडेच हाडे पडलेली दिसतात. इथे काय घडलं असावं याबद्दल ठोस निष्कर्ष नसला तरी याबद्दल या भागात बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. इथल्या स्थानिकांकडून अशा बऱ्याच दंतकथा ऐकायला मिळतात.
इथल्या या गूढ वातावरणामुळे या कुंडाला रहस्यमयी कुंड म्हणून ओळखले जाते.
Mysterious Places Of India In Marathi
३)कुलधरा गाव, राजस्थान (Kuldhara Village) निर्जन आणि भुताटकी गाव??
कुलधरा हे राजस्थानमधील जैसलमेरपासुन ३५ किमी अंतरावर असलेले एक निर्जन गाव आहे. २०० वर्षांपूर्वी एका रात्रीत गाववाल्यांनी हे गाव सोडले. या गावात ब्राम्हण लोकांनी येऊन वस्ती वसवली होती. जालीम सिंग हा गावाचा मुख्य मंत्री होता. बाईवेडाच्या आहारी गेलेला हा माणूस भयंकर क्रूर होता. त्याला या गावातल्या मुख्य माणसाची तरुण मुलगी आवडली आणि तिला आपल्याकडे पाठवा असं फर्मान त्याने सोडलं. मुलीच्या वडिलांनी नकार देताच त्याने आपली माणसे पाठवून एका दिवसात मुलगी नाही पाठवली तर पूर्ण गावाचा नाश करू अशी धमकीच दिली. आता हा वाद जालीम सिंग विरुद्ध पूर्ण गाव असा बनला होतं. यानंतर गावाने सभा बोलावत जालीम सिंगच्या अत्याचाराला बळी पडायचं नाही अशी शपथ घेतली.
आणि त्याच रात्री ५००० परिवारांनी गाव सोडून दूरवर जात दुसऱ्या गावी आसरा घेतला. मुलीच्या सन्मानासोबतच स्वतःच्या आत्मसन्मानासाठी हे लोक राहती घरे सोडून निघून गेले. असं म्हणतात कि जाताना ब्राम्हण असा श्राप देऊन गेले कि या जागी पुन्हा कधीही मानवी वस्ती उभी राहणार नाही.
आणि तेव्हापासून हे गाव ओसाड अवस्थेत निर्जन बनून आहे. त्यानंतर गावाविषयी अनेक भुतांच्या अफवा पसरत राहिल्या आणि इथे यायला लोक घाबरू लागले.
आता हे गाव पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असुन पर्यटक इथे भेट द्यायला येतात. पर्यटक इथे मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
हेही वाचा- Yogesh Alekari Mumbai To London Bike Ride मराठमोळा तरुण बाईकवरून पोहोचला थेट लंडनला
4)जतिंगा घाटी, आसाम (Jatinga Valley) काय इथे पक्षी खरेच आत्महत्या करतात??
जतिंगा घाटी हे आसाममध्ये असलेले एक ठिकाण आहे. येथे दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर यादरम्यान अनेक पक्षी आत्महत्या करतात. या कालावधीत पौर्णिमेच्या रात्री इथे ही घटना हमखास होते. स्थानिकांच्या सांगण्यानुसार रात्री सात ते दहा या वेळेतच हे पक्षी मोठ्या प्रमाणावर जमिनीवर मृत अथवा जखमी अवस्थेत सापडतात. शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार रात्री यावेळी सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. यामुळे उंचावर उडत असलेले हे पक्षी वाऱ्याच्या माऱ्यामुळे जमिनीकडे वेगात झेपावतात आणि खाली झाडे आणि इतर वस्तूंवर आदळून मृत पावतात किंवा गंभीर जखमी होतात. सुमारे ४० जातीचे पक्षी अशा रितीने मरण पावतात.
नागरिकांच्या मते ही घटना अशुभ असुन याला जुन्या लोकांचे शाप कारणीभूत आहेत. तर काहीजण याला भुताटकी म्हणूनही संबोधतात. पण शास्त्रज्ञ या घटनेला भौगोलिक कारणांचे संदर्भ देतात.
Mysterious Places Of India In Marathi
५)भानगड किल्ला, राजस्थान (Bhangarh Fort) भयानक आणि रहस्यमयी किल्ला
भानगड किल्ला हे राजस्थानमधील सर्वात भीतीदायक ठिकाण मानले जाते. हा किल्ला १७ व्या शतकात बांधला गेला होता, परंतु आता तो उजाड आहे. स्थानिक कथेनुसार, या किल्ल्यावर एक शाप आहे आणि रात्रीच्या वेळी येथे कोणीही राहू शकत नाही. भारतीय पुरातत्त्व विभागानेही या किल्ल्यात रात्रीच्या वेळी प्रवेश करण्यास मनाई केली आहे. येथील रहस्यमय वातावरण आणि भुतकथा यामुळे हा किल्ला पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. जुन्या कथांनुसार एका संताने इथल्या शासकांना सांगितले होते कि त्याच्या प्रार्थनास्थळाच्या इमारतीपेक्षा उंच महाल बंधू नये. परंतु शासकांच्या वारसांनी या नियमाचा भंग केला तथापि संताने किल्ल्याच्या नाशाचा शाप दिला.
दिवसभर जरी हा किल्ला पर्यटकांसाठी खुला असला तरी रात्रीच्या वेळी इथे कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही. रात्रीच्या वेळी घुसखोरी करून आत गेलेल्या लोकांना इथे चित्रविचित्र अनुभव आल्याच्या चर्चा आहेत. स्थानिकांच्या मतानुसार त्यांनी किल्ल्यात चित्रविचित्र आवाज, संगीत, रडण्याचा आवाज आदि गोष्टींचा अनुभव घेतला आहे. Mysterious Places Of India In Marathi
या किल्ल्यात आलेल्या विचित्र अनुभवांचे बरेच व्हिडियो आपल्याला नेटवर बघायला मिळतात.
६)कोडिन्ही, केरळ (Kodinhi) जुळ्या मुलांचे गाव
आपण आपल्या आसपास जुळी मुळे बघतोच. हजारातून एखादी जुळ्या मुलांची जोडी आपल्याला माहिती असते. पण केरळमधील कोडिन्ही या छोट्या गावात सर्वाधिक जुळी मुळे मुली सापडतात. ५५० पेक्षाही जास्त जुळ्या लोकांची इथे संख्या आहे. यामध्ये नवजात बालकापासून ते ७० वर्षाच्या वृद्धांपर्यंत जुळे लोक दिसुन येतात. या अनोख्या गोष्टीमुळे हे गाव जागतिक स्तरावर “जुळ्या माणसांचे गाव” म्हणून प्रसिद्ध आहे. शास्त्रज्ञांना यामध्ये कसलाही निष्कर्ष काढता आला नसला तरी त्यांच्या मते ही एक रहस्यमय घटना आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या घटनेचे कारण अनुवांशिक किंवा पर्यावरणीय असू शकते, परंतु अजूनही याचे निश्चित उत्तर मिळालेले नाही.
इथल्या या वैशिष्ट्यामुळे हे गाव आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे जुळ्या मुलांचे गाव म्हणून देखील ओळखले जाते.
७)लेपाक्षी मंदिर, आंध्र प्रदेश (Lepakshi Temple) मंदिराच्या खांबाचे रहस्य
लेपाक्षी मंदिर हे आंध्र प्रदेशातील एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील एक खांब अत्यंत रहस्यमय आहे. या खांबाला “हँगिंग पिलर” म्हणून ओळखले जाते. हा खांब जमिनीपासून थोडासा वर उंचावलेला आहे आणि त्याच्या खाली एखादी वस्तू सहजपणे सरकवता येते. या खांबाचे रहस्य अजूनही सोडवले गेलेले नाही आणि ते अभियांत्रिकीचे एक आश्चर्य मानले जाते.
भारतातल्या बऱ्याच मंदिरात अशा काही न काही रहस्याने भरलेल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात.
८)चुंबकीय दरी Magnetic Valley Ladakh
लडाखमधील Magnetic Valley म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका ठिकाणी एक रहस्यमयी रस्ता आहे. या रस्त्यावर चढाच्या ठिकाणी बंद केलेल्या गाड्या आपोआप चढाच्या दिशेने चालू लागतात. शास्त्रज्ञांच्या मते या ठिकाणी पर्वतात मोठ्या प्रमाणावर चुंबकीय शक्ती असुन त्यामुळे असा अनुभव पाहायला मिळतो. पण स्थानिक लोक या रस्त्याला स्वर्गाचा जुना रस्ता म्हणून संबोधतात.
Mysterious Places Of India In Marathi
भारतातील या रहस्यमय जागा केवळ भूगर्भीय किंवा ऐतिहासिक महत्त्वाच्या नाहीत, तर त्या आपल्या संस्कृतीचा आणि विश्वासांचा देखील एक भाग आहेत. या जागांमध्ये विज्ञान, इतिहास, आणि पौराणिक कथा एकत्र आहेत, ज्यामुळे त्या अधिक मोहक आणि रहस्यमय बनतात. भारतातील अशा अनेक जागा आणि तिथली न सुटणारी रहस्ये आपल्याला अचंबित करून सोडतात.
आपल्याला ही अद्भुत माहिती कशी वाटली? आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या मित्रांना शेअर करू शकता. आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्या मेल आयडी firastaa.blog@gmail.com यावर कळवू शकता.
या लेखात दिलेल्या भुताखेतांच्या गोष्टींचे आणि अंधश्रद्धांचे आम्ही समर्थन करत नाहीत. या सर्व घटना, कथा आधीपासूनच अस्तित्वात असुन सर्वांना परिचित आहेत. आम्ही फक्त ती माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. Mysterious Places Of India In Marathi