Morgiri Fort Trek मोरगिरी किल्ला- एक अपरिचित सौंदर्य

मोरगिरी किल्ला-एक अपरिचित सौंदर्य Morgiri Fort Trek in Marathi/ Hard Treks Of Maharashtra

कोरोनापूर्व काळात शेवटचं ‘भोरगिरी’ किल्ल्याला गेलो होतो आणि त्यानंतर काल वर्षभराने ‘मोरगिरी’ Morgiri Fort Trek in Marathi किल्ल्याला गेलो. मोरगिरी किल्ल्याचे आतापर्यंत बरेच लेख वाचले होते. पण नुसतं वाचून किल्याबद्दल आणि तिथे जाण्याबद्दल काही अंदाज लागत नव्हता. गेलो तर नक्की वाट सापडेल का नाही अशी दाट शंका होती. काल रात्री अचानक ठरलं, आणि आम्ही तिघे जण मित्र सकाळी सात वाजता गाड्यांवर लोणावळ्याच्या दिशेने निघालो. ट्रेकला जायचं म्हटलं की पहाटे पाच/साडेपाच ही आमची ठरलेली वेळ, पण मित्र नाईट शिफ्ट करून येणार असल्यामुळे उशीर होणारच होता.

थंडीचे दिवस होते. गाडीवर थंडीपासून बचाव करण्याचे शक्य तेवढे प्रयत्न करून आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो. लोणावळा जवळ येऊ लागला तसं थंडी वाजायला सुरुवात झाली. दाट धुक्यात गुरफटलेलं लोणावळा शहर मोहक वाटत होतं. भुशी धरणाच्या वाटेला लागुन पुढे घाटातून मार्ग काढत घाटावर पोहोचलो. तिथे असलेल्या टायगर Point वर बऱ्यापैकी  लोकं यायला सुरुवात होती. पुढे घुसळखांब फाट्यावर पोहोचून डावीकडे वळत मोरगिरीकडे मार्गस्थ झालो.

Morgiri Fort Trek in Marathi

WhatsApp Group Join Now

या हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी बघायला किंवा छायाचित्रण करायला जायचं विचार करत असाल तर हे वाचाभिगवण मध्ये होतंय परदेशी पक्ष्याचं आगमन. करा प्लान

मोरगिरी किल्ल्याला कसं जायचं? How to reach or go to Morgiri Fort Pune Maharashtra?

आपण जर एसटी बसने जाणार असाल तर, सर्वात आधी लोणावळ्याला पोहोचावे. लोणावळा बस स्थानकावरून लोणावळा ते भांबुर्डे ही एसटी बस निघते. सकाळी अंदाजे साडेआठ नऊच्या दरम्यान इथून बस निघते. (लोणावळा बस स्थानकाचा संपर्क क्रमांक- 02114 273842) भांबुर्डे बसने घुसळखांब फाट्याचं तिकीट काढून तिथे उतरावे. लोणावळा ते घुसळखांब फाटा हे अंतर १६ किमी आहे. भांबुर्डे बस इथून पुढे कोरीगड मार्गे घनगड जवळ असणाऱ्या भांबुर्डे गावात जाते. या बसनेच आपण तैलबैला कडेही जाऊ शकतो. तसेच पुढे जाऊन कैलासगड आणि कुंडलिका दरी मार्गे ताम्हिणी घाटाकडे जाऊ शकतो.

Morgiri Fort Trek in Marathi

खाजगी वाहनाने अथवा स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर लोणावळ्यातून भुशी धरण मार्गे घुसळखांब फाट्यावर यावे. इथून डावीकडे दीड किमीवर गेल्यास उजवीकडे किल्ल्याच्या नावाची पाटी आणि दोन चार घरांची एक छोटी वस्ती लागते. या घरांच्या मागूनच झाडीतून किल्ल्याकडे जायला वाट आहे.

आम्ही घुसळखांब फाट्यावर  पोहोचलो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. फाट्यावर एक दोन छोटेसे हॉटेल्स आहेत. तिथे चहा घेऊन तुंगच्या वाटेला लागलो. आतापर्यंत तुंगला तीनदा आलोय पण इथं ‘मोरगिरी किल्ल्याकडे’ अशी पाटी बघूनही कधी जायचा योग आला नव्हता. घुसळखांब फाट्यावरून तुंगच्या दिशेने एक-दीड किमी पुढं गेलो की उजवीकडे छोटी वस्ती लागते जिथं ही किल्ल्याच्या नावाची पाटी आहे. तिथं एका घराशेजारी गाड्या लावून सरळ पुढे निघालो. जराशी दाट झाडीतून जात दोन डोंगरांच्या मधून ही वाट एके ठिकाणी डावीकडे वळते. तसंच वर चढून गेलं की आपण एका विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचतो. गावापासून अर्ध्या तासात आपण या पठारावर पोहोचतो. Morgiri Fort Trek in Marathi

थंडीत बेस्ट बीचवर जायचा विचार करताय, तर हे वाचा-Best Beaches In Maharashtra Marathi महाराष्ट्रातले हे सुंदर समुद्रकिनारे आहेत सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

पठार लांबलचक पसरलेले आहे. पठारावर डाव्या बाजूला एक डोंगर आहे . त्याच्या पुढे कातळटोपी घातलेला डोंगर आहे . तो मोरगिरी किल्ला आहे. पठारावरुन किल्ल्याच्या माथ्यावर फडकणारा भगवा झेंडा दिसतो. इथून दिसणारा नजारा निव्वळ अप्रतिम आहे. इथून कोरीगड एकदम जवळ दिसतो.

पठारावरून बरंच पुढे चालत डावीकडच्या डोंगराला उजवीकडून वळसा घालत, दरी उजवीकडे ठेवत पुढे गेलं की डावीकडे वळून पुढे गेलं की किल्ल्याचा डोंगर दिसू लागतो. थोडंसं पुढे गेलं की डावीकडे गडाकडे जाण्यासाठी पाटी लावलेली दिसते. Morgiri Fort Trek in Marathi

कारवीच्या दाट झाडीतून आत घुसलं की ती वाट सरळ खड्या चढणीने चढत आपल्याला थेट पाण्याच्या टाक्याजवळ घेऊन जाते. हा चढ एकदम खडा असून दमछाक करणारा आहे. इथं आम्हाला कोकणदिव्याची आठवण झाली. कोकणदिवा किल्ल्याच्या पायथ्याची चढण देखील अशीच खडी आहे. वर पाण्याच्या टाक्याच्या आधी किंचित अवघड रॉकपॅच लागतो. याठिकाणी घसरडी जागा असल्यामुळे काळजीपूर्वक चढाई करावी लागते.

हा घसरडा खडा चढ चढून वर आल्यावर, गडाच्या माथ्यावर जाण्याच्या वाटेने चालायला लागलो असता, आपल्याला एका पाठोपाठ एक अशा ठराविक अंतरावर  पाण्याच्या ३ लहान टाक्या लागतात. पहिली दोन्ही टाकी कातळात खोलगट खोदलेली दिसतात.
पहिल्या टाकीतील पाणी चांगले दिसते. पण टाकीतील पाणी तळाशी आल्यामुळे, तळाच्या मातीमुळे पाणी अस्वच्छ दिसते. दुसऱ्या टाकीचे पाणी शेवाळ साचल्यामुळे हिरवे दिसत होते. दोन्ही टाकी अंदाजे ५ फूट खोल असावीत. या दोन्ही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे तिसरं टाकं आणि बाजूला जाखमाता देवीचं एका छोट्या गुहेतलं छोटं मंदिर आहे. इथं दोन-तीन लोकं बसतील एवढी जागा आहे. टाकीत थोडा कचरा टाकलेला होता तरी नितळ पाणी असल्यामुळे हे पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो. या टाक्याजवळून वर गड माथ्याकडे जायला एक लोखंडी शिडी लावलेली आहे. Morgiri Fort Trek in Marathi

 

खाली खोल दरी असल्यामुळे ही छोटी शिडी चढताना भीती वाटते. शिडी चढून वर गेलं की कातळात खोदलेल्या छोट्या पायऱ्या लागतात. त्या चढून वर गेलं की आपण थेट गडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. गड माथ्यावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्याच्या बाजूलाच २ पाण्याची टाकी आहेत. त्यातील एक मोठी चौकोनी आकाराची टाकी आहे. टाकीत गाळ साचल्यामुळे पाणी गढूळ दिसते. गढूळ पाण्यामुळे पाणी पिण्यायोग्य नाही. त्याच टाकीच्या जवळ गडाच्या कडेला  साधारण तीन फूट खोल सुकलेली एक लहान टाकी आहे.

पाण्याचं टाकं आणि छोटीशी गुहा याव्यतिरिक्त किल्ल्यावर कसलेही अवशेष दिसून येत नाहीत. गड माथ्यावर भगवा झेंडा दिमाखात फडकताना दिसतो. इथून जबरदस्त लँडस्केप नजरेस पडतो. पुढे तुंग किल्ला, त्याच्या मागील बाजूने वेढा घातलेला पवनाचा जलाशय, त्यापुढे तिकोना, बाजूला लोहगड, विसापूर, कोरीगड, आणि बरचसे लहान-मोठे डोंगर/सुळके बघून मन प्रसन्न होतं. Morgiri Fort Trek in Marathi

मोरगिरी किल्ल्याची उंची (Height of the Morgiri Fort) ३०१० फूट एवढी असून शेवटच्या टप्प्यातील अवघड चढणामुळे आणि गोंधळात टाकणाऱ्या वाटेमुळे ह्या किल्ल्याची ट्रेक श्रेणी मध्यम ते अवघड अशी समजली जाते. 

मोरगिरी किल्ल्याचे उंचीवरचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहाता हा मोरगिरी किल्ला फक्त टेहळणीसाठी बांधला आणि वापरण्यात येत असावा. गडाच्या माथ्यावर कुठेही सावली नसल्यामुळे आपल्याला खाली मंदिराजवळ वा पाण्याच्या टाक्याजवळच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. शिडी उतरून खाली गुहेजवळ जरावेळ आराम करून आम्ही सोबत आणलेला डब्बा काढून जेवण केलं. तसेच इथे सावली आणि थंड वातावरण असल्यामुळे अर्धा तास निवांत पहुडलो आणि उठून परतीच्या प्रवासाला लागलो.

Morgiri Fort Trek in Marathi

मोरगिरी किल्ला ट्रेक साठी काही महत्वाच्या सूचना/टीप्स Tips For Morgiri Trek

१)मोरगिरी किल्ल्याचा हा ट्रेक बऱ्यापैकी दमछाक करणारा असून नव्या ट्रेकर्सला कठीण वाटेल असा आहे. भर पावसात इथं येणं शक्यतो टाळावं. शेवटच्या चढाई जवळ वाट चढणे पावसाळ्यात अवघड आहे.

२)उन्हाळ्यात ट्रेक करताना जास्तीत जास्त उन्हातुनच चालावे लागते. त्यामुळे कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी आणि योग्य ती काळजी घ्यावी. शेवटच्या चढाईच्या टप्प्यात दाट झाडी लागते. Morgiri Fort Trek in Marathi

३)शेवटच्या एका rock patch च्या ठिकाणी घसरडी वाट असल्यामुळे तिथे योग्य ती काळजी घ्यावी. नवखे लोक सोबत असतील विशेष काळजी घ्यावी.

४)ट्रेक मोठा आणि लांबलचक असल्यामुळे सोबत भरपूर पाणी आणि अन्न पदार्थ असु द्यावेत. खाली गावात चौकशी करून जेवणाची सोय होऊ शकते.  गडावर झाड आणि सावली नसल्यामुळे आपण गुहेच्या बाजूला असणाऱ्या सावलीत बसून जेवण अथवा नाश्ता करू शकता.

५)ट्रेक करताना इथे बरेचदा वाट कळून येत नाही. वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. अनुभवी ट्रेकर असाल तर  काही अडचण नाही, परंतु अगदीच नवखे असाल तर सोबत वाटाड्या/ Guide घेतलेला कधीही उत्तम राहील. खाली असलेल्या वस्तीवर विचारणा केल्यास तिथुन वाटाड्या मिळू शकतो.

पुण्यापासून मोरगिरी किल्ल्याचे अंतर ६३ किमी असुन मुंबईपासून १०० किमी आहे.

Morgiri Fort Trek in Marathi

 

वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया किंवा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडीवर देखील कळवू शकता. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने असलेले पेज शोधून आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

आम्ही आपल्यापर्यंत अशाच अनवट वाटेवरचे किल्ले आणि डोंगर याबद्दल माहिती घेऊन येणार आहोत. या सविस्तर माहितीचा आपल्याला आपला ट्रेक प्लानिंग करण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी आम्हाला आशा आहे.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog

हेही वाचा- भातराशी डोंगर ट्रेक, भाताच्या राशीसारखा आकार असणारा मावळामधील आणि पुण्यापासून जवळचा एक सुंदर डोंगर

6 thoughts on “Morgiri Fort Trek मोरगिरी किल्ला- एक अपरिचित सौंदर्य”

  1. अप्रतिम तुझ्यासोबत ट्रेक करण म्हणजे अभूतपूर्व अनुभव येतो तूझ्या मुळे मला बरेच ट्रेक करायला मिळाले धन्यवाद

Comments are closed.