Manache famous Ganpati in Pune पुण्यातील मानाचे पाच गणपती

Ganesh Utsav 2024: हे आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती! दहा दिवसात लाखो भाविक देतात भेट.! जाणुन घ्या संपूर्ण माहिती, कसं जाल? काय बघाल?

Manache famous Ganpati in Pune

सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय. लहानथोर ते अबालवृद्ध यापर्यंत सर्वजण दरवर्षी गणरायाची आतुरतेने वाट बघत असतात. महाराष्ट्रात दरवर्षी सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पुण्यातील गणपती हे खास करून देशभरात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते देश विदेशातून लोक पुण्यातील गणपती उत्सवाला आवर्जून हजेरी लावत असतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यातूनच सन १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि सोबत भाऊ रंगारी गणपती, दगडूशेठ गणपती, मंडई गणपती, बाबूगेनू गणपती असे इतर प्रसिद्ध गणपती हे पुण्यातील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असतात. दहा दिवसांच्या या गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या कानाकोपऱ्यांतून आणि राज्यभरातून भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते. गणपती काळात विविध गणपती मंडळांसोबतच पुण्यातील ढोलताशा पथक देखील आजच्या काळात तितकेच लोकप्रिय बनत चालले आहेत. या ढोलपथकांमधील कार्यकर्ते महिनाभर आधीपासूनच सरावाला सुरुवात करतात. ढोलपथकांची आजच्या तरुणाईमध्ये दिवसेंदिवस क्रेझ वाढताना दिसुन येत आहे.

Manache famous Ganpati in Pune

गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुसार कितीही बदलले आणि आधुनिक होत चालले तरी पुण्यातील मानाच्या गणपतींचे महत्त्व आजही तितकेच कायम आहे. चला तर मग पुण्यातील या मानाच्या गणपतींविषयी जाणून घेऊयात…

WhatsApp Group Join Now

मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती Kasaba Ganpati

पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिद्ध आहे. कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या कसबा पेठेतल्या देवळातला गणपती. शनिवारवाड्याच्या जवळच पुणे शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे हे पेशवेकालीन मंदिर आहे. या गणपती मंदिराला १४०० वर्षांचा इतिहास आहे.

Manache famous Ganpati in Pune

कसबा गणपतीची मूर्ती एका दगडी गाभाऱ्यात असुन तांदळा स्वरूपात आहे.   आठवड्यातून दोन वेळेस या मूर्तीला शेंदूरलेपन केले जाते. ही मूर्ती स्वयंभू असुन साडेतीन फूट उंचीची आहे. ही मूर्ती कर्नाटकमधून पुण्यात स्थायिक झालेल्या काही ब्राम्हण कुटुंबांनी आणली असल्याचे बोलले जाते. सन १६३६ मध्ये जेव्हा शहाजीराजांनी पुण्यात लाल महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जिजाउंनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सन १८९३ सालापासून कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ हा कसबा गणपतीपासूनच होतो. पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या गणपती मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते.

कसे जाल पुणे महानगरपालिका जवळच्या बस थांब्यापासून बसने इथे जाता येते. मनपा बस थांब्यावरून येत असाल, तर मनपा पुलावरून (शिवाजी पूल) शनिवारवाड्याच्या दिशेने पायी चालत जावे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून आपण पाच मिनिटांमध्ये श्री कसबा गणपतीच्या महाद्वाराजवळ पोहोचतो. वेशीतून आत गेल्यावर कसबा गणपतीचे मंदिर दिसते.

Manache famous Ganpati in Pune

मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी गणपती Tambadi Jogeshwari Ganpati

 

तांबडी जोगेश्वरी गणपती हे पुण्याचे दुसरे ग्रामदैवत मानले जाते. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेत असलेल्या या गणेशोत्सवाला सुरुवात केली. पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची स्थापना १८९३ साली झाली. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत व तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदेवता आहे. म्हणूनच टिळकांनी विसर्जन मिरवणुकीत कसब्याच्या गणपतीस मानाचे पहिले तर तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या या गणपतीला मानाचे दुसरे स्थान दिले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्यापासून विसर्जन मिरवणुकीमध्ये हे मानाचे स्थान कायम आहे.

तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि म्हणूनच या मंदिराच्या परिसरात गणपतीची मूर्ती असल्याने देवीच्याच नावाने हा गणपती ओळखला जातो. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळच आणि पुण्याच्या मध्यवस्तीत आहे. आधी इथल्या गणपतीची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्येच केली जात असे, परंतु २००० सालापासून मंदिराच्या बाहेरच मंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. पुण्यातील मानाच्या गणपतीमूर्तींचे आणि इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही. पण, तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि प्रत्येक वर्षी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

 

कसे जाल?  कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटच्या दिशेने पायी चालल्यावर पाच मिनिटांत जिजामाता चौक ओलांडून आपण हुतात्मा चौकात येतो. तिथून आप्पा बळवंत चौकाच्या दिशेने गेल्यावर अगदी एक मिनिटातच आपण तांबडी जोगेश्वरी गणपती मंदिराच्या ठिकाणी पोहोचतो. येथून जवळच असलेल्या भाऊ रंगारी गणपतीचेही दर्शन घेता येते.

Pune Ganpati Darshan Guide 2024
Manache famous Ganpati in Pune

मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम गणपती Guruji Talim Ganpati

पुण्यातील गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्यातील मानाचा तिसरा गणपती मानला जातो. सुरुवातीला हा गणपती तालमीत बसवला जायचा, पण आता ही तालीम अस्तित्वात नाही. पुण्यातील सर्वात मोठी तालीम असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाल्यानंतर या गणपतीला मानाचे तिसरे स्थान दिले गेले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीच म्हणजे सन १८८७ सालीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवाले, शेख कासम वल्लाद, रस्तुमभाई नालबंद यांनी १८८७ मध्ये या गणपतीची स्थापना केली होती. गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जायचा आणि आजही ओळखला जातो.

 

कसे जाल? : तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने तुळशीबागेच्या दिशेने चालत गेल्यावर एक मिनिटात आपण लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकात पोहोचतो. तिथून उजव्या दिशेला गेल्यास गुरुजी तालीम गणपतीचे दर्शन घेता येते.

हेही वाचा-केंजळगड- कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा सुंदर किल्ला Kenjalgad Fort Trek Marathi 2024

मानाचा चौथा गणपती -तुळशीबाग गणपती Tulsibaug Ganpati

तुळशीबाग सार्वजनिक गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती मानला जातो. हा गणपती त्याच्या भव्य मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. मुर्तीसोबतच इथला देखावा देखील भव्य असतो.

 

दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०१ साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. १९७५ साली इथल्या मंडळाने फायबरच्या गणेश मूर्तीची स्थापना केली. तुळशीबाग इथल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या जागेत या गणपतीची स्थापना केली जाते. महिलांमध्ये खरेदीसाठी लोकप्रिय असलेल्या तुळशीबागेतील जागेत या गणेशमूर्तीची स्थापना होते. पुण्यातील नाविन्यपूर्ण हलत्या देखाव्यांची सुरुवात श्री तुळशीबाग गणपती मंडळाने केली.

कसे जाल? : गुरुजी तालीम गणपतीचे दर्शन घेऊन तसेच चालत जात लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकात पोहोचा. तिथुन पुढे जात तुळशीबागेत प्रवेश केल्यावर तुळशीबाग गणपतीचे दर्शन घेता येईल.

 

मानाचा पाचवा गणपती – केसरी वाडा गणपती Kesariwada Ganpati

लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात असलेला हा गणपती पुण्यातील मानाचा पाचवा गणपती मानला जातो. सन १८९४ सालापासून लोकमान्य टिळकांच्या केसरी संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते. त्यानंतर १९०५ पासून केसरीवाड्यात केसरी या संस्थेचा गणेशोत्सव होऊ लागला. त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने केसरीवाड्यात होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूकदेखील आधीपासूनच पालखीतून निघते. ती परंपरा आजही जपली आहे. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून जाते तर केसरी वाड्याच्या गणपती मूर्तीचे केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जन केले जाते.

 

Manache famous Ganpati in Pune

कसे जाल?  तुळशीबाग गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गणपती चौकातून सरळ चालत जात तांबडी जोगेश्वरी मंदिर व तिथून आप्पा बळवंत चौकापर्यंत पायी चालत व त्यानंतर केळकर रस्त्याने चालत गेल्यास केसरी वाड्यापर्यंत पोहोचता येते.

 

पुण्यातील या मानाच्या गणपतींव्यतिरिक्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तसेच मंडईचा गणपती या गणपतींचे देखील दर्शन घेता येते. हे सर्व गणपती जवळजवळ असल्याने चालत जात हे गणपती बघता येतात.

हेही वाचा-पुण्यातील प्रसिद्ध १० ठिकाणं

 

अशा रितीने पुण्यातील या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर तिथुन परत येण्यासाठी मनपापर्यंत चालत गेल्यास तिथुन पीएमपीएमएल बसेसची सुविधा रात्री उशिरापर्यंत सुरु असते.

खास सूचना– गणपतीच्या दहा दिवसांच्या काळात तसेच विसर्जनाच्या दिवशी पुण्यात भयंकर गर्दी लोटलेली असते. अगदी पाय ठेवायला जागा मिळणार नाही इतकी जनता राज्यभरातून पुण्यात आलेली असते. त्यामुळे जर का आपण आपल्या कुटुंबाला, लहान मुलांना घेऊन जाणार असाल तर जाणं टाळा किंवा तशी सावधगिरी बाळगा. ढोल पथकांसोबतच कर्णकर्कश्श डीजे आणि सोबतीला लेझर लाईट्सचा भडीमार यामुळे गणपती सोहळ्याला एक वेगळं स्वरूप येत आहे. सुरक्षित राहा.

Manache famous Ganpati in Pune

मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आम्ही आपल्यापर्यंत अशीच सविस्तर आणि खास माहिती घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण आमच्या ब्लॉगला भेट देत चला. आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर देखील कळवू शकता. ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी या साईटवर whatsapp किंवा फेसबुकचा आयकॉन दिसेलच.

तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. जेणेकरून आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचत राहील.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog