Ghangad Fort घनगड किल्ला ट्रेक

घनगड ट्रेक Ghangad Fort Trek

ऑक्टोबरच्या एका गुरुवारचा ठरलेला राजमाची ट्रेक ऐनवेळी पहाटे तब्येतीने दगा दिल्यामुळे रद्द करावा लागला आणि खूप वाईट वाटलं. सगळं केलेलं नियोजन पाण्यात गेलं होतं. मग २६ ऑक्टोबरला गुरुवारी घनगडाचा बेत पक्का केला. तुंग प्रमाणेच याहीवेळी मित्र आणि मी आम्ही दोघेच असणार होतो. बाकी मित्रांना रविवारी सुट्टी आणि आम्हाला गुरुवारी असल्यामुळे बाकी कोणाला विचारलंही नव्हतं. त्यानुसार मग गुरुवारी सकाळी ७:०० च्या लोकलने चिंचवडहुन लोणावळ्याला जायला निघालो. ८ वाजता लोणावळ्यात उतरून मिसळपावचा नाश्ता केला आणि एसटी स्टँडवर येऊन बसलो. बसची चौकशी केली असता समजलं की भांबुर्ड्याला जायला ९ वाजता बस आहे पण भांबुर्ड्यातुन परत यायची शेवटची बस दुपारी अडीच वाजता आहे. त्यामुळे धावपळ करून कसंही अडीचच्या आत आम्हाला एसटी साठी येऊन थांबावं लागणार होतं.

Ghangad Fort
९ वाजता भांबुर्डे बस लोणावळा बस स्थानकातून निघाली. हा ट्रेक माझ्यासाठी खास असणार होता. कारण माझा नवा मोबाईल आलेला होता. (रेडमी नोट ४) आणि फोटोग्राफीची खूप उत्सुकता लागून राहिली होती. बस लोणावळ्यातुन बाहेर धावू लागली तशी एकेका थांब्यावरून बसमध्ये गर्दी वाढत चालली. गुलाबी रंगाचे बुढी के बाल चे गुच्छ घेऊन काही पोरं बसमध्ये चढली तसं बसमधल्या लहान पोरांची बेचैनी वाढत चालली आणि त्यांच्या आयांची डोकेदुखी वाढली. मी आपला बाहेरचा निसर्ग न्याहाळत होतो. सिमेंटच्या जंगलाचं अस्तित्व पुसट होत चाललं होतं आणि खऱ्याखुऱ्या जंगलाचा सुंदर नजारा नजरेस येऊ लागला होता. दुतर्फा दाट झाडी असलेल्या त्या घाटातून प्रवास करणं म्हणजे सुखच आहे एकप्रकारचं.

Ghangad Fort

WhatsApp Group Join Now

पाऊण तासात गाडी पेठशहापुर मधून आंबवणे मध्ये आली. इथून कोरीगड Korigad Fort दिसतो. दोन वर्षांपूर्वी आम्ही इथे आल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. इथून गाडी महामार्ग सोडून भांबुर्डेकडे जाणाऱ्या एकेरी रस्त्याला लागली तशी रस्त्यावरची वाहतूक नाहीशी झाली. एकदम छोट्याश्या त्या रस्त्यावर खड्डे चुकवत मोठी गाडी चालवणं म्हणजे एकप्रकारचं दिव्यच आहे. सालतर च्या पुढे एका ठिकाणी रस्ता एकदम छोटा आणि खतरनाक होत जातो. गाडीत आता आम्ही दोघेच प्रवाशी उरलो होतो.

भांबुर्डे जवळ येऊ लागलं होतं. माझं लक्ष उजव्या खिडकीतून बाहेर होतं. आणि अचानक दाट झाडीतून आतापर्यंत मी ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या तैलबैल्याचे दर्शन झाले. डोंगराच्या दोन दोन उभ्या भिंती असणारा हा तैलबैला Tailabaila म्हणजे सह्याद्रीतील एक आश्चर्यच आहे. बसमधून पुढे नजर गेली तर भांबुरड्याच्या मागे दोन छोटे सुळके नजरेस पडले. मनाला मोहवून टाकणाऱ्या त्या दृश्याने आम्ही मनोमन सुखावलो. भांबुर्ड्यात १०:१५ वाजता उतरल्यावर त्या सुळक्यांकडे बघतच राहिलो.

हेही वाचा- ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले

घनगडाच्या अलीकडे दिसलेले ते सुळके एका आजीने ‘नवरा नवरीचे सुळके’ असल्याचं सांगितलं. सह्याद्रीत फिरताना आपल्याला अशी अनेक गमतीशीर नावं ऐकायला मिळतात. त्या आजींनी त्यांच्या घरी चहाचं आमंत्रण दिलं आणि आम्ही “बघू, लवकर उतरलो तर येऊ” म्हणून तिथून निघालो. पुढे घनगड Ghangad Fort आमच्या स्वागतासाठी उभा होता. उजवीकडे दूरवर एकटा उभा असलेला तैलबैला सह्याद्रीच्या राकट-कणखर रूपाचं दर्शन देत होता.

शेतातल्या बांधा बांधावरून चालत आम्ही पुढे निघालो. पुढे पंधरा मिनिटांवर असलेल्या एकोले गावात चालत जायचं होतं. आजूबाजूला असलेल्या भाताच्या शेतात कापणी चालू होती. लोकं उत्सुकतेने आमच्याकडे बघत होती. थोडयाच वेळात पुढच्या एका वस्तीवर पोहोचलो. एका घरात विचारलं असता तिथे लहू कडू नावाचा स्थानिक युवक भेटला. तो एकोले गावातला होता. मग गप्पा मारत त्याच्याबरोबर निघालो. या परिसरात येणाऱ्या भटक्या लोकांचा तो वाटाड्या होता. किल्ला सोपा आणि लहान असल्यामुळे आम्हाला वाटाड्याची काही गरज पडणार नव्हती. त्याने त्याच्या घरी नेऊन आम्हाला पाणी दिलं, थोडा वेळ बसून आम्ही त्याच्याकडून Ghangad Fort किल्ल्याची वाट समजून घेऊन तिथून पुढे निघालो.
१० मिनिटे चालल्यावर आम्ही गडाच्या पायथ्याला लागलो. वाटेतल्या पिवळ्या रानफुलांचे अर्थात सोनकीचे फोटोसेशन जोरात सुरु होते.

थोडासा गड चढल्यानंतर पुढे गारजाई देवीचं मंदिर लागलं. त्याच्या भिंतीवर एक छोटासा शिलालेख कोरलेला आहे तर मंदिराच्या पुढच्या जागेत काही विरगळी ठेवलेल्या आहेत. मंदिरात काही लोकांची मुक्कामाची सोय होऊ शकते. तिथून वरती गेलं की डाव्या बाजूला एक छोटीशी वाट जाते. त्या वाटेने थोडं पुढं गेलं की तिथून खालच्या दऱ्याखोऱ्यांचं मनमोहक दर्शन होतं. Ghangad Fort

नंतर माघारी येऊन थोडं वर चढून गेलं की उजव्या बाजूला एक गुहा लागते. गुहेच्या दोन खोल्यांपैकी एक खोली उघडी आहे तर एक छोटीशी खोली गेट लावून बंद केलेली आहे. उघडी गुहा स्वच्छ असल्यामुळे इथेही मुक्कामाची सोय होऊ शकते. पुढे गेलो की वरून एक मोठा कातळखडक घसरून खाली एका टोकाला डोंगराला टेकून उभा असलेला दिसतो. त्यामुळे त्या दोन्हींमध्ये एक नैसर्गिक कमान तयार झाली आहे.

तिथेच उघड्यावर एक छोटंसं देवीचं मंदिर आहे. तिथे थोडंसं खाऊन आणि फोटो काढून घेतले. तिथून तसंच पुढं गेलं की वाट बंद होते. त्यापुढे एक पाण्याचं टाकं आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी एक वायर लावलेला आहे. त्याला पकडून जरासं जपून पुढे गेलं की पाण्याचं टाकं दिसतं. तिथून चालताना जरा जपूनच चालावं लागतं, कारण गवत वाळलेलं असल्यामुळे पाय घसरू शकतो. आणि खाली खोल दरी आहे. दुर्दैवाने तिथून उतरताना माझ्या सॅकमधली पाण्याची एक प्लॅस्टिकची बाटली उसळुन खाली दरीत कोसळली. ट्रेकर लोकं निसर्गात घाण करत नसतात पण माझा नाईलाज असल्यामुळे ती बाटली मी घेऊ शकलो नाही त्याचं वाईट वाटलं. Ghangad Fort

माघारी गुहेजवळ येऊन पुढे वर जायला एक लोखंडी शिडी लावली आहे. तिथून वर चढलं कि पहिलं एका टाक्याचं दर्शन होतं. तिथून आपण थोडं वर गेलं की गडाचा भग्न दरवाजा दिसतो. आत शिरलं कि ५ मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. वरती छातीएवढं गवत माजलेलं होतं. पुढे टोकाला गेलं की तैलबैल्याचं आणि पायथ्याच्या दऱ्यांचं दृश्य खूप सुंदर दिसतं. पुढे सुधागड आणि दूरवर सरसगड दिसतो तर Ghangad Fort च्या पायथ्याला असलेलं किवणी पठार वेड लावतं. या पठारावर पावसाळ्यात नक्की जायला हवं, इथून पुढचा नजारा खरंच खूप सुंदर दिसणार.

तैलबैल्याचे बरेचसे फोटो काढून गडाच्या दुसऱ्या टोकाला आलो. इथे भगवा झेंडा फडकत आहे. गडाचा माथा एवढाच आहे. गवत वाढल्यामुळे पाण्याच्या टाक्यांव्यतिरिक्त काही दिसत नाही. वेळ कमी असल्यामुळे आम्ही आवरतं घेतलं. नाश्ता करून लगेच गड उतरायला सुरुवात केली. २० मिनिटात गड उतरून पुढे भांबुर्डे गावाकडे निघालो. वाटेत पुन्हा फोटोग्राफी सुरूच होती. सव्वादोनला गावात येऊन थांबलो. २:२५ ला एसटी आली आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.
अशा रीतीने ट्रेक डायरी मध्ये आज घनगडाची भर पडली. एक छोटा आणि सुंदर ट्रेक असं या ट्रेकचं वर्णन करता येईल. Ghangad Fort

 

काही उपयुक्त माहिती-

-सध्या लोणावळाहुन एकोले अर्थात घनगडला जायचं रस्ता चांगल्या स्थितीत असुन आपल्या गाड्या आरामात नेऊ शकता. लोणावळा मधून ST बसची सोय आहे. माहितीसाठी बसस्थानकाला संपर्क करा.

-भांबुर्डे गावातून पुढे गेल्यास कैलासगड किल्ला तसेच पुढे कुंडलिका दरी आणि ताम्हिणी घाटाकडे जाऊ शकता. या वाटेवर निसर्ग एकदम सुंदर असुन हा प्रवास नक्की करा. कुंडलिका दरीजवळ अंधारबन हा ट्रेक देखील आहे. कुंडलिका दरी बघून पुढे मुळशीला जाऊन पुण्यात येऊ शकता.

-घनगड बघून खाली किवणी पठार मार्गे ट्रेक करत जात खडसांबळे लेण्यादेखील बघता येतात. पावसाळ्यात मात्र हा लेणीचा ट्रेक टाळा.

-पावसाळ्यात या भागात स्वर्गीय सुंदरता पसरलेली असते. नक्की आस्वाद घ्या. निसर्गाची काळजी घ्या.

Lotus Point Waterfall, Ekole Valley near Ghangad Fort-

अलीकडेच प्रसिद्धीस आलेलं एकोले Valley (Ekole Valley) मधील लोटस वॉटरफॉल (lotus Waterfall) हे धबधबा असलेलं ठिकाण घनगडपासुन जवळच आहे. भांबुर्डे गावाकडून तैलबैला कडे जायच्या रस्त्यावर ५०० मीटर अंतरावर उजव्या हाताला एक मारुती मंदिर लागते आणि डाव्या हाताला एक छोटं पडकं घर आहे. त्या पडक्या घराच्या पाठीमागून जात एक वाट नाळेत उतरते. सुरुवातीला पायरीमार्ग लागतो आणि पुढचा पूर्ण रस्ता नाळेतून जातो. तिथुन ट्रेक करत जात वाहत्या पाण्याच्या प्रवाहासोबत जात आपण पाऊण तासात या धबधब्याजवळ पोहोचतो.
इथे नैसर्गिक रित्या तयार झालेल्या कुंडात जरी लोक उतरून पोहत असले तरी हे कुंड खोल आहे, त्यामुळे खास दक्षता घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात कुंडामध्ये उतरणारा रस्ता निसरडा होत असल्यामुळे आणि पाण्याच्या प्रवाहात वाढ होत असल्यामुळे इथे उतरणं टाळावं.
फेब्रुवारी २०२४ मध्ये इथे जाण्यासाठी आलेल्या लोकांच्या गाड्या वाळलेल्या गवताला आग लागल्यामुळे जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे गाड्या पार्क करताना देखील विशेष काळजी घ्यावी.
भटक्या मित्रांनो, हा लेख आपल्याला आवडला का? आपण आपल्या सूचना, प्रतिक्रिया आम्हाला firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर कळवू शकता. ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपण आपल्या मित्रपरिवाराला whatsapp, facebook द्वारे शेअर देखील करू शकता.
-टीम फिरस्ता

2 thoughts on “Ghangad Fort घनगड किल्ला ट्रेक”

Comments are closed.