Bhatrashi Mountain Pune भाताच्या राशीसारखा दिसणारा भातराशी डोंगर

Bhatrashi Mountain Pune Trek- Bhatarashi Hill

Treks near Pune भातराशी डोंगर – एक नितांतसुंदर ट्रेक 

१५ ऑगस्टला कुठे जायचं याचं नियोजन करताना भातराशी डोंगर ट्रेक (Bhatrashi Mountain Pune Trek) करायचं ठरलं. बरेच दिवसांपासून ह्या डोंगरावर जायचं डोक्यात होतं. पण फेसबुकवर/गुगलवर फक्त दोनचारच जणांनी त्याबद्दल लिहिलेलं होतं. आणि त्यांनीही हा ट्रेक कामशेत मधून किंवा पाटणमधून केलेला होता. कामशेतवरून ह्या ट्रेकला जास्त वेळ लागतो तर पाटण मधूनही बराच वेळ लागतो. आणि नेमका पाय दुखत असल्यामुळे एवढं चालण्यासाठी आत्मविश्वास येत नव्हता. मालेवाडी मधून एक रस्ता आहे असं कळल्यावर १५ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजता आम्ही चौघेजण तळेगावातुन दोन गाड्यांवर निघालो. मालेवाडीचा मॅप लावला. कामशेतवरून डावीकडे वळून पुढे जात पवना dam च्या अलीकडे काले कॉलनीमधुन उजवीकडे आत वळत आम्ही मालेवाडीच्या दिशेने निघालो. Bhatrashi Mountain Pune Trek
सर्वत्र झेंडावंदनाची लगबग सुरू होती. १० मिनिटांत आम्ही गावात पोहोचलो आणि नेमकं तिथेच आमच्या गाडीची चैन स्लीप झाली. डोंगर समोर दिसत होता, पण इतक्या उंचीवर असलेला डोंगर बघून नक्की किती वेळ लागेल आणि कसं जायचं हे समजेना. चौकशी केल्यावर कळलं की भातराशीवर जायला अजून वर आणि डोंगराच्या पायथ्याला असलेल्या मालेवाडी गावात जावं लागेल. म्हणजे मॅपने आम्हाला साफ गंडवलं होतं. आम्ही मालेवाडी म्हणून महागाव या गावात आलो होतो. समोर मालेवाडीला जायला घाटरस्ता दिसत होता. रस्ता तर समजला होता, पण आम्हाला आधी गाडीची चैन दुरुस्त करावी लागणार होती. ढिली झालेली चैन कशीतरी तात्पुरती बसवून आम्ही परत काले कॉलनीत आलो. गॅरेजवाल्याची तासभर वाट बघून ती चैन सेटिंग करून घेऊन आम्ही मालेवाडीच्या दिशेने निघालो.
अरुंद घाटरस्ता चढत आणि पुढे दिसणारे लोहगड विसापूर बघत बघत आम्ही मालेवाडीजवळ येऊन पोहोचलो. वाटेतल्या घाटात ठिकठिकाणी थोडी थोडी दरड कोसळली होती. मालेवाडीच्या अलिकडून विसापूरला एक वाट जाते, त्यामुळे इथं पार्किंग आणि हॉटेल्स गावकऱ्यांनी सुरू केले आहेत. विसापूरला जायला बऱ्यापैकी लोकं आली होती. बहुदा सुट्टीच्या दिवशीच इथल्या लोकांना थोडाफार रोजगार मिळत असावा. एकतर विसापूर किल्याला जाणारी ही वाट तेवढी परिचयाची नसल्यामुळे इकडे लोक जास्त फिरकत नाहीत. आम्हाला भातराशीला जायचं असल्यामुळे विसापूर च्या वाटेला न लागता आम्ही पुढे दिसणाऱ्या मालेवाडी गावाकडे निघालो. एक मिनिटात आम्ही गावात पोहोचलो आणि त्या एका खोलीच्या जिल्हा परिषद शाळेसमोर गाड्या लावल्या. मालेवाडी हे आठ दहा घरांचं छोटंसं गाव आहे आणि महागाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येतं. विसापूरला इथून वाट जात असल्यामुळे इथल्या लोकांना तेवढाच अतिरिक्त रोजगार उपलब्ध झाला आहे. Bhatrashi Mountain Pune Trek
शाळेसमोर तिरंगा दिमाखात फडकत होता, आणि त्याभोवती सुंदर रांगोळी काढलेली होती. गावातली या शाळेत एकच खोली होती. आणि बहुतेक सर्व वर्ग त्यातच भरत असावेत. गावातली काही बायका माणसं वाटेतल्या  हॉटेलवर असल्यामुळे गावात शांतता होती. जवळपास कोणी दिसत नव्हतं. शाळेच्या बरोबर पुढुनच एक वाट डोंगराच्या दिशेने झाडीत जाते. हीच वाट असावी असा अंदाज बांधून  त्या वाटेला आम्ही निघालो. जाताना गावात एका घरासमोर एक आजी दिसल्या. त्यांना लांबूनच रस्ता विचारला असता
आजीने लांबुनच ओरडुन कुठे जायचं ते सांगितलं, पण कुठपर्यंत जायचं ते काही आम्हाला ऐकू आलं नाही आणि आम्ही त्या वाटेवर मार्गस्थ झालो. दूरवर झाडीतून गेलेली एक पायवाट दिसत होती.
त्या पायवाटेने जात असताना आम्हाला वाटेत झाडांना रिबीन्स बांधलेल्या दिसल्या. आणि आम्ही योग्य वाटेवर जात असल्याचा आम्हाला समज(?) झाला. दलदलीच्या त्या वाटेवर पुढे जात असताना मच्छरांनी आमच्यावर यथेच्छ ताव मारला. वाटेत बऱ्याच ठिकाणी दलदल साचलेली होती. त्यातून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. निर्मनुष्य असलेल्या त्या भागात संपूर्ण धुके पसरलेले होते आणि आमच्या मनात आता भीती दाटायला सुरुवात झाली होती. त्या निर्जन भागात एखादा वन्यप्राणी समोर येतो कि काय अशी भीती वाटू लागली होती.  Bhatrashi Mountain Pune Trek

भातराशी डोंगर Bhatrashi Dongar – Beautiful and less crowded trek near Pune and Mumbai

सुमारे तासभर पुढे गेल्यावर कळून चुकलं की आपण चुकीच्या वाटेवर चाललो आहोत. आम्ही डोंगराच्या समांतर चालत होतो आणि डोंगरावर जायला काही वाट दिसत नव्हती. मग तसेच माघारी फिरलो आणि दुसरी वाट बघू म्हणून निघालो. गावात जिथं गाड्या लावल्या होत्या तिथून १०० मीटर अलीकडेच उजवीकडच्या घरात एका ताईंना वाट विचारली तर त्यांनी घरासमोरची वाट दाखवली जी थेट डोंगरावर जात होती. (म्हणजे ज्या रिबीन्स बघत आम्ही पुढे गेलो त्या खरंतर जाण्यासाठी नसून कामशेत वरून इकडं येणाऱ्या लोकांसाठी होत्या) त्या झाडीतून वर जाणाऱ्या वाटेवरून वर चढत आम्ही १५ मिनिटांत भातराशीच्या पठारावर येऊन पोहोचलो. इथून विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना हे किल्ले, पवना धरण, पाटण गाव, बेडसे लेणीच्या वरच्या वाघेश्र्वर मंदिराचा कळस, बोगद्यातून बाहेर पडणारा एक्सप्रेसवे, जुना मुंबई पुणे रस्ता आणि मावळातला बराचसा परिसर नजरेस पडतो.
Bhatrashi Mountain Pune Trek

डोंगराच्या एका कडेवरच्या ठिकाणी बसून विसापूर किल्ला न्याहाळत आम्ही सोबत आणलेला फरसाण आणि बिस्किटाचा नाश्ता केला. इथे कड्यावर बसायला फार छान वाटलं. सभोवतालचा सारा सुंदर परिसर बघत निसर्गाचा आवाज अनुभवत थोडावेळ आराम केला.

समोरच दिसणाऱ्या विसापूर किल्ल्यावर बरीच गर्दी दिसत होती. कॅमेऱ्याच्या झूम लेन्सने बघितलं तर किल्ल्यावर तिरंगा फडकत असलेल्या ठिकाणी काही आर्मी जवानही दिसत होते. स्वातंत्र्यदिन असल्यामुळे बरीच पब्लिक किल्ल्यावर आलेली दिसत होती. तिथे काहीवेळ फोटोशूट करून आम्ही पुढच्या दिशेने निघालो.

भातराशी डोंगरावर खूप मोठं आणि लांबलचक पसरलेलं पठार आणि डोंगराच्या मधल्या भागी एका छोट्या टेकडीवर डोंगराचा माथा आहे, जो भाताच्या राशीसारखा दिसतो. म्हणूनच या डोंगराला भातराशी डोंगर असं नाव पडलं असावं. Bhatrashi Mountain Pune Trek

WhatsApp Group Join Now

हेही वाचा- आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ.

तिकडे जाताना. वाटेत बरीच पाण्याची डबकी साचलेली दिसली. इथं बऱ्याच प्रमाणात मोठमोठे खेकडे दिसून आले. पठार संपून आम्ही आता डोंगरमाथा चढू लागलो. वर जाण्यासाठीची पायवाट ही भुसभुशीत आणि घसरडी झाली असल्यामुळे चढायला त्रास होत होता. काही वेळातच आम्ही माथ्यावर पोहोचलो आणि दूरवर दिसणारं निसर्गसौंदर्य बघून आनंद झाला. काही वेळातच डोंगर दाट धुक्यात गडप झाला. प्रचंड वारा वाहत होता आणि त्यामुळेच एका संस्थेने लावलेला इथला भगवा झेंडा जीर्ण होऊन नाहीसा झाला होता. काही वेळ थांबून सोबत आणलेल्या तिरंग्यासोबत फोटो काढून आम्ही डोंगर उतरायला लागलो. माथ्यावरून उतरताना निसरड्या वाटेमुळे घसरगुंडी करत जपूनच खाली यावं लागलं. Bhatrashi Mountain Pune Trek

तासाभरात आम्ही खाली गाडीपाशी आलो. वाट दाखवलेल्या ताईंच्या छोट्या बाळाला बिस्कीटपुडा दिला आणि परतीची वाट धरली. ट्रेक लिस्टमध्ये अजून एक डोंगर समाविष्ट झाल्याचं समाधान चेहऱ्यावर झळकत होतं.

टीप: Tips for Bhatarashi Mountain Trek, Pune

१)भातराशी डोंगरावर कसे जायचे? How To Reach/ go to Bhatrashi Mountain Hill? मालेवाडी वरून भातराशी डोंगरावर जायचा रस्ता हा एकदम सोपा आणि सर्वात कमी वेळ लागणारा आहे. गावातल्या शाळेपासून १०० मीटर अंतरावर उजवीकडे डोंगरावर जायला रस्ता आहे. पुढे जाण्याचे कष्ट घेऊ नयेत. कामशेत वरून चढुन भातराशीला जाणार असाल तर तिकडून जास्त वेळ लागतो तसेच वाट माहिती नसल्यास वाटाड्या सोबत घ्यावा.
२)डोंगरमाथा उतरताना वरच्या बाजूला वाट घसरडी असल्यामुळे सावकाश उतरावे.
३)डोंगरावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे भरपूर पाणी सोबत असु द्यावे.
४)जेवणाची सोय खाली गावात होऊ शकते. गावकऱ्यांना तशी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.
५)कमी गर्दीचं ठिकाण असल्यामुळे इथला परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. कृपया आपला कचरा आपल्यासोबतच आणावा.
६)पायथ्याच्या मालेवाडी गावात जाण्यासाठी गुगल मॅप लिंक-  https://maps.app.goo.gl/YFHBWjKrQ6pvHL1L6
७)ट्रेकमध्ये भरपूर चालावे लागते, तशी तयारी आवश्यक आहे. तसेच डोंगरावर शक्यतो जास्त कोणी येत नसल्यामुळे एकटे जाणे टाळावे. जेणेकरून अडचणीच्या वेळी पुढील समस्या उद्भवणार नाहीत.
८)मालेवाडीला जायच्या घाटातला रस्ता हा अरुंद असुन पावसाळ्यात ठिकठिकाणी अल्प प्रमाणात दरडी कोसळतात, लाल माती, रस्त्यावर वाहून येते. त्यामुळे गाडी चालवताना योग्य ती काळजी घ्यावी.
Bhatrashi Mountain Pune Trek

वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया, सूचना कमेंट करा किंवा मग आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर कळवा. आपण ही माहिती आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच  आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाच्या  पेजवर आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.

पुणे तसेच इतर जिल्ह्यांमध्येही असे आडवाटेवरचे सुंदर डोंगर टेकड्या असतात ज्यांच्याविषयी आपल्याला तितकी माहिती नसते. आम्ही आपल्यापर्यंत अशाच सुंदर ठिकाणांची माहिती पोचवणार आहोत. जेणेकरून आपला ट्रेक, प्रवास विनाअडथळा पूर्ण होईल.

ही अमूल्य माहिती आपल्याला आपल्या संबंधित प्रवासाचे, ट्रेकिंगचे उत्तम नियोजन करण्यास नक्कीच मदत करेल असा आम्हाला विश्वास आहे.

टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग Marathi Travel Blog

2 thoughts on “Bhatrashi Mountain Pune भाताच्या राशीसारखा दिसणारा भातराशी डोंगर”

Comments are closed.