भटक्यांची पंढरी- हरिश्चंद्रगड किल्ला Harishchandragad Fort Trek In Marathi
उंचच उंच डोंगरकड्यांवरून काढलेले सूर्यास्ताचे मनमोहक फोटो, मागे दाटून आलेले दाट धुके वा ढग आणि त्यामागे चहूबाजूंनी तुटलेल्या कोरीव डोंगररांगा किंवा त्या मागच्या दाट धुक्यातून चमकणारा इंद्रवज्र नावाचा मनमोहक प्रकार असे फोटो आपण बऱ्याचदा बघितले असतील. अशा स्वप्नवत ठिकाणी जायचं आपल्या कायम मनात असतं. या सुंदर जागेचे नावं आहे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड किल्ला कायमच तिथल्या निसर्गसौंदर्यामुळे भटक्या लोकांना भुरळ घालत आलेला आहे.
Harishchandragad Fort Trek In Marathi
WhatsApp Group
Join Now
भौगोलिक वर्णन Geography Of Harishchandragadमाळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला हरिश्चंद्रगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यांच्या सीमेवर हा किल्ला वसलेला आहे. या जिल्ह्यांच्या सीमा एकत्र येतात तिथुन सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे जाते. या रांगेला हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या या सह्याद्रीच्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड किल्ला आहे. हरिश्चंद्रगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ४००० फुट असुन हा किल्ला चढाईच्या बाबतीत मध्यम श्रेणीत मोडतो. हरिश्चंद्रगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात असुन आजुबाजुला कळसुबाई, रतनगड, कात्राबाई, आजोबा डोंगर, अलंग मदन कुलंग, भैरवगड, हडसर, चावंड हे सह्याद्रीतील सुंदर किल्ले आणि डोंगर आहेत. Harishchandragad Fort Trek In Marathi हरिश्चंद्रगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती व विविध प्राणी इथे आढळुन येतात. पावसाळ्यात गड विशेष खुलून जातो. हरिश्चंद्रगडावर पोहोचण्याच्या सोप्या ते थरारक वाटा, इथला कोकणकडा आणि इथला निसर्ग या कारणांमुळे हरिश्चंद्रगडाला ट्रेकर्सची/ भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाते. हेही वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले हरिश्चंद्रगडाचा ईतिहास History Of Harishchandragad-भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या आणि सुंदर असलेल्या हरिश्चंद्रगड किल्ल्याला तितकीच मोठी ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. हरिश्चंद्रगडाला तब्बल दोन ते चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. या किल्ल्याचा उल्लेख प्राचीन अग्निपुराण व मत्स्यपुराण यांमध्ये देखील आढळतो. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावं असल्यामुळे हरिश्चंद्रगड किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला गेला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांमध्ये आचार्य चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. आदिवासी महादेव कोळी समाजाकडून हरिश्चंद्रगड किल्ला मुघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे हे हरिश्चंद्रगड किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते. त्यानंतर इंग्रजांनी १८१८ साली हा किल्ला जिंकून घेतला. Harishchandragad Fort Trek In Marathi हरिश्चंद्रगडावर पाहण्याची ठिकाणे Places To Visit On Harishchandragad-१)कोकणकडा Kokankada Harishchandragadहरिश्चंद्रगड जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे तो म्हणजे इथल्या विशिष्ट कोकणकड्यामुळे. अर्धगोलाकार आकाराचा, अर्धा किलोमीटर परीघ असलेला हा रौद्रभीषण कोकणकडा पायथ्यापासुन साधारण ४५०० फुट उंच आहे. कोकणकड्यावरून आपण उभे राहून खाली बघूच शकणार नाही असा धडकी भरवणारा हा कोकणकडा आहे. वातावरण अनुकूल असल्यास कोकणकड्यावरून खाली जमलेल्या ढगांमध्ये इंद्रवज्र दिसतो. इंग्रजी ‘U’ आकाराचा हा अर्धगोलाकार कडा त्याच्या रौद्ररुपामुळे खास लोकप्रिय आहे. इथे होणारी गर्दी बघता वनविभागाने या कोकणकड्याच्या बाजुने लोखंडी रेलीन्ग्स लावले आहेत जे कि कोकणकड्याच्या मूळ सौंदर्याला बाधा आणतात. Harishchandragad Fort Trek In Marathi २)हरिश्चंद्रेश्वर मंदिर Harishchandreshwar Templeगडावर असणाऱ्या तारामती शिखराच्या पायथ्याशी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या पुढे असणाऱ्या पुलाखालून एक ओढा वाहत जातो. यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ म्हणतात. मंदिराच्या आवारात अनेक गुहा बघायला मिळतात. यातील काही गुहा राहण्यायोग्य आहेत तर काहींमध्ये पाणी साचलेले आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या खोलीत चांगदेव ऋषींनी चौदाव्या शतकात तप करून तत्वसार हा ग्रंथ लिहिला असे मानले जाते.
३)केदारेश्वर गुहा Kedareshwar Caveमंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर केदारेश्वर गुहा लागते. या गुहेमध्ये १ मीटर उंचीचे आणि २ मीटर लांबीचे शिवलिंग आहे. या गुहेमध्ये पाणी साचलेले आहे. ही गुहा चार खांबांवर तोललेली होती पण सध्या एकच खांब शाबूत आहे. या गुहेत एक खोली असुन भिंतीवर शिवपुजनाचा प्रसंग कोरलेला आहे. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी थंडगार पाण्यात उतरून जावे लागते.
४)तारामती शिखर Taramati Peakतारामती शिखर हे हरिश्चंद्रगडावरील सर्वात उंच शिखर आहे. तारामती शिखराच्या खालच्या बाजूला खडकात कोरलेल्या आठ नऊ लेण्या असुन एका गुहेच्या बाहेर शंकर व गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या गुहा दहाव्या-अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात व येथील लेणी ही हिंदू लेणी असावीत असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. इथल्या एका गुहेत सहा फुट उंचीची गणपती मूर्ती कोरलेली आहे. तारामती शिखरावरून समोरचे जंगल, घाटावरचा तसेच कोकणातला प्रदेश न्याहाळता येतो. Harishchandragad Fort Trek In Marathi
हरिश्चंद्रगडला कसे जायचे? How To Reach Harishchandragad In Marathi१)पाचनई मार्गे –पाचनई (Pachnai) हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गडावर जाण्यास सुमारे ३ तास लागतात. ही वाट फारच सोपी आहे. पाचनई पासुन हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर ६ किमी अंतरावर आहे. मुंबईहुन- मुंबईहून येत असाल तर कसारा, इगतपुरी मार्गे मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी बुद्रुक गावावरून उजवीकडे वळून राजुर या अकोले तालुक्यातील गावी यावे. तिथुन पाचनई गावात यावे. राजूर ते पाचनई अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. राजूर ते पाचनई हे अंतर २९ किमी आहे. मुंबई ते पाचनई हरिश्चंद्रगड हे अंतर २०० किमी आहे. पुण्याहून- पुण्याहून येत असाल तर चाकण-मंचर-नारायणगाव-ओतूर-कोतुळ मार्गे पाचनई गावात यावे. पुणे ते पाचनई हरिश्चंद्रगड हे अंतर १६४ किमी आहे. Harishchandragad Fort Trek In Marathi २)खिरेश्वर मार्गे-पाचनई व्यतिरिक्त खिरेश्वर (Khireshwar) या गावावरून देखील गडावर जायला सोपी वाट आहे. खिरेश्वर गावातून टोलार खिंडीमधून गडावर ३ तासात जाता येते. खिरेश्वर गावातून एक किमी अंतरावर खिरेश्वर हे अकराव्या शतकातील प्राचीन शिवमंदिर लागते. मुंबईहून- मुंबईहून कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाटातून पुढे गेल्यास खिरेश्वर गाव लागते. मुंबई ते खिरेश्वर हे अंतर १४० किमी आहे. माळशेज घाटातून खिरेश्वर १२ किमी अंतरावर आहे. पुण्याहून- पुण्याहून मंचर-नारायणगाव मार्गे जात ओतुरवरून डावीकडे वळत पिंपळगाव जोगा धरणाच्या बाजुने गेल्यास खिरेश्वर गाव लागते. पुणे ते खिरेश्वर हे अंतर ११५ किमी आहे. Harishchandragad Fort Trek In Marathi ३)नळीची वाट-नळीची वाट (Nalichi Waat) ही हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठीची सर्वात अवघड वाट आहे. नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावी यावे. इथून गडावर जाण्यास ८ ते १२ तास लागतात. वाटेत भलेमोठे दगड असुन सोबत दोर बाळगणे तसेच चांगला अनुभव असणे आवश्यक आहे. ही वाट अत्यंत अवघड असुन प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय इकडून जाऊ नये. Harishchandragad Fort Trek In Marathi हेही वाचा- आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रात. पुण्या मुंबईपासून आहे खुपच जवळ. हरिश्चंद्रगडावर राहण्याची आणि जेवणाची सोय कुठे होते?-हरिश्चंद्रगडावरील गुहेमध्ये ५० ते ६० लोकांची राहायची सोय होते. तसेच स्थानिकांकरवी तंबूंची सोय देखील होऊ शकते. हरिश्चंद्रगडावर जेवणाची सोय होते. गडावर पाणी मुबलक प्रमाणात आहे. गडावर स्थानिक रहिवाशांचे हॉटेल्स असुन तिथे जेवायची चांगली सोय होते. तसेच पायथ्याच्या पाचनई आणि खिरेश्वर गावात देखील राहण्या जेवणाची उत्तम सोय होते. Harishchandragad Fort Trek In Marathi हरिश्चंद्रगडावरील काही स्थानिकांचे (लोकल गाईड्सचे) संपर्क क्रमांक Harishchandragad Local Guides Contacts-भास्कर बादड- 9325336926 (सरपंच-पाचनई) ज्ञानेश्वर बादड- 9689494769 रोहिदास बादड- 8265080135 किरण भारमल- 7066214669 हेही वाचा-सांधण दरी- नगर जिल्ह्यातील एक अद्भुत आश्चर्य जे आहे जगभरात प्रसिद्ध हरिश्चंद्रगड हा किल्ला आणि आजुबाजूचा निसर्ग स्वर्गासमान सुंदर असुन गडप्रेमी ट्रेकर्ससोबतच इथे हौशी आणि बेशिस्त पर्यटकदेखील गर्दी करतात. त्यामुळेच या सुंदर गडावर मोठ्या प्रमाणात कचरा, दारूच्या बाटल्या आदि कचरा मोठ्या प्रमाणात आढळतो. याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत पाचनई यांच्यातर्फे काही नियम घालुन दिले गेले आहेत. त्यानुसार कचरा करणे, मद्यपान करणे, गोंधळ घालणे, स्थानिकांशी वाद घालणे यासारख्या गोष्टी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचे निर्देश ग्रामपंचायतीने दिले आहेत. पावसाळ्यात हरिश्चंद्रगड किल्ला कमालीचा खुलून जातो. हिरवागार शालू पांघरलेल्या निसर्गाच्या साथीने आणि दाट धुक्याच्या चादरीत गुडूप झालेला हरिश्चंद्रगड अनुभवणे हे स्वर्गीय सुख आहे. सप्टेंबर महिन्याच्या आसपास गडाचा सारा परिसर कारवीच्या तसेच इतर शेकडो रानफुलांनी फुलून जातो. हे सुख बघायला एकदा तरी हरिश्चंद्रगड बघायलाच हवा. तर मग कधी करताय प्लान? सर्व डिटेल्स आम्ही वर दिलेले आहेतच. Harishchandragad Fort Trek In Marathi तर भटकंती प्रेमी आणि वाचक मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपण आपल्या प्रतिक्रिया वा सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com या मेल आयडी वर कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला असेल तर ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. आम्ही आपल्यापर्यंत अशीच छान छान माहिती आणत राहणार आहोत. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील follow करू शकता. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा. |
|