केंजळगड Kenjalgad Fort Trek Sahyadri
मागचा ट्रेक करून कित्येक दिवसांचा काळ लोटला होता. कसाबसा मागच्या रविवारी एका मित्रासोबत केंजळगडला जायचा प्लान केला. पहाटे साडेपाचला हिंजवडी मधुन निघालो. हवेत तसा कमीच गारवा होता. हायवेला गाडी लागली आणि ऐन हिवाळ्यात पाऊस सुरू झाला. मग नाईलाजाने वाकड चौकात एका हॉटेलच्या पुढे गाडी लावून चहा घेतला. आता पाऊस वाढेल आणि घरी माघारी जावं लागेल या विचारानेच भयंकर वैताग आला. एकतर कित्येक दिवस कुठे गेलो नव्हतो आणि आज जायचं म्हटलं तर ह्या पावसाचं मध्येच काय असे विचार सुरू झाले. अर्ध्या पाऊण तासात पाऊस थांबला आणि आम्ही भोरच्या दिशेने कूच केली.
Kenjalgad Fort Trek Sahyadri
रस्त्यात स्पोर्ट्स बायकर्सच्या रांगा लागल्या होत्या. आमची ड्रीम युगा बेंबीच्या देठापासून पळवत आम्ही भोरमध्ये दाखल झालो. एका हॉटेलात मिसळपाव आणि चहा घेतला व केंजळगडाच्या दिशेने निघालो. भोरच्या बाहेर निघालो तसं रस्त्यावरची वाहतूक विरळ होत गेली.
डावीकडे रोहिडा किल्ला त्याच्या मागून उगवणाऱ्या सूर्याच्या किरणांत न्हाऊन निघाला होता. केंजळगडाच्या पायथ्याला पोचलो तेव्हा नऊ वाजले होते. शाळेपुढे गाडी लावून आम्ही गड चढायला सुरुवात केली.
Kenjalgad- Forts Of Maharashtra In Marathi
झाडीतल्या वाटेतून वर चढत आम्ही एका मोकळ्या जागेत येऊन पोचलो. इथुन पुढे धोम जलाशय आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला कमळगड दिसतो. वातावरणात बऱ्यापैकी धुकं असल्यामुळे तेवढं स्पष्ट दिसत नव्हतं. इथुन केंजळगड अप्रतिम दिसत होता. थोडा वेळ तिथं फोटो काढून आम्ही किल्ल्याकडे निघालो.
किल्ल्याची खासियत म्हणजे इथल्या दगडात कोरलेल्या भव्य पायऱ्या ज्या अगदी जवळ येईपर्यंत दिसत नाहीत. पायवाटेवरून चालत जेव्हा आपण एका वळणाला वळतो आणि समोर ह्या भव्य पायऱ्या दिसल्या की आश्चर्यचकित होतो. ह्या पायऱ्यांच्या खालीच एक मोठी गुहा आहे.
Kenjalgad Fort Trek Sahyadri
केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग ठिकाणी उभारलेला आहे. भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपी घालावी अशा आकाराचा हा किल्ला दुरूनच ओळखायला येतो.
हेही वाचा-ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले
केंजळगडाचा इतिहास History Of Kenjalgad Fort | |
इसवी सनाच्या बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगड किल्ल्याची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा मुक्काम चिपळूण शहरात होता. वाई व आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांनी ताब्यात घेतले होते. मात्र केंजळगड अजूनही त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड ताब्यात घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा त्यावेळी केंजळगड किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने किल्ल्यावरून मराठ्यांच्या फौजांना चोख प्रत्युत्तर दिले. पण पुढे मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये केंजळगड किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे सन १७०१ मध्ये हा केंजळगड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. पुढे दि. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने केंजळगडाचा ताबा घेतला. |
केंजळगडावर बघण्यासारखी ठिकाणं Places To Visit On Kenjalgad Fort
गडावर एक पाण्याचं टाकं, देवीची मूर्ती, एक छोटं तळं, चुन्याचा घाणा आणि एक कोठारवजा खोली वगळता बाकी जास्त काही बघण्यासारखे अवशेष नाहीत. गडाच्या सगळ्या बाजूंनी उभे कातळकडे आहेत. गडाचा घेर अगदी छोटाच असल्यामुळे गड तासाभरात आरामात बघून होतो. माथ्यावरून जवळच असलेलं विस्तीर्ण असं रायरेश्वर पठार दिसतं. गडाचा घेरा तसा छोटाच आहे. गडाच्या चारही बाजूंनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी देखील आहे. गडाच्या एका बाजूला वाईच्या दिशेस थोडी फार तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरूजही इथे आढळुन येतो. एक कोरडे टाके तसेच काही वास्तूंचे भग्न अवशेषही इथे आढळतात. Kenjalgad Fort Trek Sahyadri
हे देखील वाचा- लातूर मधल्या अपरिचित लेणी- खरोसा लेणी लातूर Kharosa Caves Latur Maharashtra-Hidden Beauty Of Latur 2024
एक चुन्याचा घाणा चांगल्या स्थितीत आढळतो. त्यापुढे जात एक चांगली मजबूत छोटी दगडी खोली आढळते. साधारण कोठार असल्यासारखी तिची रचना दिसुन येते. प्राचीन कागदपत्रांमधील उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्वराच्या दिशेने ओसाड असा माळ आहे. कोठारापासून दुसर्या दिशेने चालत गेल्यास आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुन्याचे घाणे आहेत म्हणजे गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेले असले पाहिजे. पण माथ्यावर सर्व बाजूंना छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुसर्या चुन्याच्या घाण्याच्या पुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. छप्पर नसलेल्या या मंदिरात केंजाई देवीची मूर्ती आहे. तसेच इतरही काही देवतांच्या मूर्ती आसपास बघायला मिळतात.
केंजळगडाची ही डोंगररांग पावसाळ्यात सुंदर हिरवाईने नटलेली असते. पावसाळ्यानंतरच्या काळात इथे आल्यास सारा परिसर हिरवाईने आच्छादलेला असतो. अशा सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी पर्यटकांना आकर्षक करत असतो. Kenjalgad Fort Trek Sahyadri
केंजळगडावरून पुढे धोम जलाशयाच्या बाजूने जाणारी वाट बघत उत्सुकता जागी झाली आणि तिकडे काय असेल असा विचार करत गूगल अर्थ बघितलं तर तो रस्ता वाईकडे जातो हे कळालं. वाई इथुन अगदी ३० किमी अंतरावर आहे. सह्याद्रीमध्ये फिरताना कायमच अशी उत्सुकता असते. एखादा रस्ता कुठे जात असावा, त्या डोंगराच्या पलीकडे काय असेल असं कायम वाटत राहतं. तर आम्ही गड उतरून पलीकडे घाटातून खाली खावली या गावी उतरलो. आणि पुढे जात अर्ध्या तासात मेणवली या गावी पोहोचलो.
Kenjalgad Fort Trek Sahyadri
वाई शहरापासून जवळ असणारा मेणवली घाट आणि नानांचा वाडा Menavali Ghat Wai In marathi
मेणवली गावात नाना फडणवीस यांचा वाडा आणि नदीवरचा घाट खुप प्रसिद्ध आहेत. नाना फडणवीस यांना वाई शहराच्या पश्चिमेकडे असणारा भाग भगवानराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांनी इनाम म्हणून दिला होता. त्यांनी सन १७६८ मध्ये सध्याचे मेणवली हे टुमदार गाव वसवले आणि कृष्णा नदीच्या काठावर हा चौसोपी दोन मजली वाडा बांधला. या वाड्यात कारंजे, विहीर, पोटमाळा व इतर अनेक सोयी आहेत. वाड्याला चारी बाजूला दगडी तट बांधलेला आहे.
वाड्यात या सर्व सोयी व्यतिरिक्त नानांचा छोटा दरबार, शेजारीच एक विश्राम कक्ष आहे. दरबारात जाण्यासाठी एक अरुंद जिना आहे आणि तिथुन चोर वाटेने बाजूलाच असलेल्या नदीच्या घाटावर जाण्याची सोय आहे. पूर्वेला मुख्य दरवाजा आहे, त्यावर नौबतखाना व त्या समोरच एक त्यावेळचा गोरख चिंचेचा वृक्ष आहे. नानांनी या वाड्यात बरीच मोडी लिपीतील कागदपत्रे व इतर मौल्यवान साहित्य ठेवले होते. तेच आता ‘मेणवली दप्तर’ म्हणून ओळखले जाते. Kenjalgad Fort Trek Sahyadri
वाड्याला लागुनच असलेल्या कृष्णा नदीच्या मेणवली घाटावर बऱ्याच मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. ही दोन्ही ठिकाणं एकमेकांना लागूनच आहेत. वाड्यात कसल्यातरी ऐतिहासिक मराठी चित्रपटाच्या शूटिंगची तयारी चालू होती.
मेणवली बघुन आम्ही पुढे वाईमध्ये पोहोचलो. वाई गाव खरेतर इथे असणाऱ्या विविध सुंदर मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. पण पुरेशा वेळेअभावी आम्ही पुढे न जाता पुण्याच्या रस्त्याला परतीच्या प्रवासाला लागलो. खुप दिवसांपासुन वाई बघायचं होतं. थोडक्यात आजचा दिवस सार्थकी लागला होता.
केंजळगडावर कसं जाल? How To Reach To Kenjalgad Fort?
१)भोरमार्गे
भोरहून सकाळी साडेसातला कोर्ले या गावी जाण्यासाठी एसटी बस असते. तिथे उतरून गडापर्यंत चालत जायला २ तास लागतात. किंवा खाजगी वाहनाने किल्ल्याच्या पायथ्याच्या वस्तीपर्यंत पोहोचता येते. स्वतःचं वाहन असेल तर थेट पायथ्यापर्यंत गाडी जाते. रस्ता चांगला आहे. भोरमधून किल्ला २५ किमी अंतरावर आहे.
२)वाईमार्गे केंजळगड
वाई वरून साधारण ३० किमी अंतर आहे. गडाच्या खालच्या खावली या गावी उतरून तिथून गडावर चालत येऊ शकता किंवा गाडी असेल तर थेट गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वस्तीपर्यंत येता येते.
Kenjalgad Fort Trek Sahyadri
-केंजळगड आणि रायरेश्वर हे दोन्ही किल्ले जवळच असल्यामुळे एका दिवसात दोन्ही ठिकाणं आरामात बघुन होतात.–
-गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्याचं पाणी पिण्यायोग्य आहे.
–गडावर राहायची सोय नाही. जेवणाची सोय खाली गावात होऊ शकते.
-भोर ते केंजळगड यांच्या मध्ये आंबवडे गावात पुरातन शिवमंदिर आणि ब्रिटीशकालीन झुलता पूल आहे. तिथेही नक्की भेट द्या.
Kenjalgad Fort Trek Sahyadri
हेही वाचा-हरिश्चंद्रगडाला ट्रेकर्सची पंढरी का म्हणतात?
वाचकहो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया व सूचना आम्हाला आमच्या firastaa.blog@gmail.com वर कळवू शकता. आपण ही माहिती मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. तसेच आपण आम्हाला सोशल मीडियावर अर्थात फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील जोडले जाऊ शकता. Firastaa नावाने पेज आहे, तिथे आम्हाला follow करा. तसेच आमच्या firastaa या WhatsApp चॅनलला देखील जॉईन व्हा.
टीम Firastaa- मराठी ट्रॅव्हल ब्लॉग
हेही वाचा- घनगड किल्ला ट्रेक