Forts Near Mumbai For Trekking ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध मुंबईजवळील किल्ले
ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध मुंबईजवळील किल्ले- मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. जिला ‘मायानगरी’ असे देखील म्हणतात. अनेक प्रसिद्ध गोष्टींकरिता मुंबई प्रसिद्ध आहे. बॉलीवूड, शेअर बाजार, समुद्रकिनारे, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, डबेवाले यासोबतच झगमगाट असणारा मुंबईचा माहोल प्रसिद्ध आहे. जगभरातून अनेक लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. मुंबई हे तसे धावते शहर आहे. इथला माणूस सतत स्वप्नांमागे धावत राहतो. अशा या मुंबईत बरीच प्रसिद्ध पर्यटनस्थळे देखील आहेत. शहरासोबतच मुंबईच्या आजुबाजुला देखील बरीच ठिकाणे आहेत जी आपण नक्की फिरली पाहिजेत. आज आपण मुंबईच्या जवळ असणारे किल्ले कुठले आहेत हे बघुयात. या एका दिवसात बघून होणाऱ्या प्रसिद्ध किल्ल्यांना सर्वांनी एकदा नक्की भेट दिली पाहिजे.
Treks Near Mumbai
१)वसईचा किल्ला Vasai Fort, Mumbai
वसईचा किल्ला हा मुंबईतील वसईमध्ये असणारा समुद्रकिनाऱ्याजवळील किल्ला आहे. वसई हे बंदर असल्याने पुरातन काळी या किल्ल्याला भौगोलिक दृष्ट्या मोठे महत्व होते.
काय पाहाल?
किल्ल्यावर दरवाजा, मारुती मंदिर, बुरुज, चर्च, आश्रम, तटबंदी, वाडा, तलाव, उध्वस्त चौथरे, विहीर, मंदिरे आणि इमारतीचे अवशेष बघायला मिळतात. किल्ला बघायला साधारण तीन तास लागतात.
कसे पोहोचाल?
वसई रेल्वे स्टेशनपासुन किल्ला ६ किमी अंतरावर आहे.
मुंबई पासुन वसईचा किल्ला ३९ किमी अंतरावर आहे.
२)उरणचा किल्ला Uran Fort/ Dronagiri Fort
मुंबईजवळ असलेल्या उरण या बंदराजवळ द्रोणागिरी उर्फ उरणचा किल्ला हा छोटा आणि सुंदर किल्ला आहे. ९१० फुट उंचीवर असलेला हा किल्ला चढाईसाठी सोपा आहे. Forts Near Mumbai For Trekking
काय काय पाहाल?
ONGC च्या कंपनीच्या बाजूलाच असणारा हा किल्ला एका छोट्या डोंगरावर दाट झाडीत लपलेला आहे. किल्ल्यावर एक बुरुज, प्रवेशद्वार, चर्च आदि अवशेष आहेत. पाऊण तासात किल्ला बघून होतो. ONGC या सरकारी कंपनीचा एक सुरक्षारक्षक या किल्ल्यावर २४ तास असतो. गडावरून या ONGC प्लान्टचे फोटो अथवा video काढू नयेत.
कसे पोहोचाल?
उरण या गावी पोहोचून तिथुन तासाभरात किल्ल्यावर पोहोचता येते.
मुंबई ते उरण हे अंतर ४६ किमी आहे.
३)इरशाळगड किल्ला Irshalgad Fort
इरशाळगड हा गिरिदुर्ग किल्ला ३७०० फुट उंचीवर असुन चढाईसाठी मध्यम श्रेणीचा आहे. हा एक सुळकाच असुन किल्ला असल्याचा इतिहासात कुठेही उल्लेख आढळत नाही. Forts Near Mumbai For Trekking
काय पाहाल?
पायथ्याच्या इरशाळवाडीपासून या सुळक्याच्या नेढ्यापर्यंत जाता येते. इथून वर जायला प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. वर विशाळा देवीची मूर्ती आहे.
गडावरून प्रबळगड, माथेरान, चंदेरी, कर्नाळा, मलंगगड, माणिकगड हे किल्ले दिसतात.
कसे पोहोचाल?
खोपोली चौक मार्गे जात इरशाळवाडी हे पायथ्याचे गाव आहे. पायथ्यापासुन गडावर जायला दीड तास लागतो.
मुंबईपासुन इरशाळगड किल्ला ६० किमी अंतरावर आहे.
४)कलावंतीण प्रबळगड Kalavantin Prabalgad
प्रबळगड किल्ला आणि त्याच्या बाजूलाच असणारा कलावंतीण सुळका पुणे मुंबई महामार्गावरून जाताना लक्ष वेधून घेतो. कलावंतीण सुळक्याला अनेक पर्यटक भेट देत असले तरी प्रबळगडाला मोजकेच लोक भेट देतात.
काय काय बघाल?
प्रबळगडाचा माथा म्हणजे एक विस्तीर्ण पठार असुन जंगलाने व्यापलेले आहे. गडावर गणेश मंदिर, पाण्याची टाकी, काही इमारतींचे अवशेष, कलावंतीण सुळका ही ठिकाणे आहेत. Forts Near Mumbai For Trekking
गडावरून माणिकगड, इरशाळगड, कर्नाळा हे किल्ले दिसतात.
कसे पोहोचाल?
पनवेलजवळील ठाकूरवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन इथून गडावर जायला १ तास लागतो.
मुंबई ते प्रबळगड आणि कलावंतीण सुळका हे अंतर ५४ किमी आहे.
हेही वाचा- केरळला ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ उगाच नाहीत म्हणत! Kerala Tourist Places
५)कर्नाळा किल्ला Karnala Fort
कर्नाळा पक्षी अभयारण्यात असणारा कर्नाळा हा किल्ला त्याच्या अंगठ्याच्या आकारामुळे सहज लक्ष वेधून घेतो. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला २५०० फुट उंचीवर असुन ट्रेकिंगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा आहे.
किल्ल्यावर काय काय बघाल?
किल्ल्यावर उध्वस्त प्रवेशद्वार, भवानी माता मंदिर, ढासळलेला वाडा, पाण्याची टाकी, धान्य कोठार हे अवशेष आहेत. तसेच पायथ्याशी पक्षी अभयारण्य आहे. गड छोटा असुन अर्ध्या तासात बघून होतो. Forts Near Mumbai For Trekking
किल्ल्यावर कसे पोहोचायचे?
पनवेल जवळील शिरढोण गावाजवळ कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि किल्ला आहे. पायथ्यापासुन गडावर जायला अडीच ते तीन तास लागतात.
मुंबईपासून कर्नाळा किल्ला ५१ किमी अंतरावर आहे.
६)माहुली किल्ला Mahuli Fort
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असणारा माहुली किल्ला तिथल्या निसर्गसौंदर्याने पर्यटकांना मोहात पडतो. गिरिदुर्ग असणारा हा किल्ला २८०० फुट उंचीवर असुन ट्रेकिंगसाठी मध्यम श्रेणीचा आहे. अनेक सुळके असणारा माहुली किल्ला दुरूनच लक्ष वेधून घेतो. माहुली किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासाचा मोठा वारसा लाभलेला आहे. Forts Near Mumbai For Trekking
पळसगड, भंडारगड आणि माहुली असे किल्ल्याचे तीन भाग पडतात.
काय पाहाल?
किल्ल्यावर प्रवेशद्वार, पाण्याची टाकी, देवड्या, वजीर सुळका इत्यादी अवशेष बघायला मिळतात.
किल्ल्यावरून अलंग, मदन, कुलंग, हरिश्चंद्रगड, कळसुबाई इत्यादी किल्ले आणि बराचसा परिसर बघायला मिळतो.
कसे पोहोचाल?
शहापूर तालुक्यातील आसनगाव पासुन जवळ असणारे माहुली हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या वाटेने गेल्यास २ तासात किल्ल्यावर पोहोचता येते. दुसरी वाट ही वाशिंद या गावाकडून असुन या मार्गाने गेल्यास कल्याण दरवाजा लागतो. या मार्गाने किल्ल्यावर जायला ७ ते ८ तास लागतात.
मुंबईहुन माहुली किल्ला ८० किमी अंतरावर आहे.
७)मलंगगड किल्ला Malanggad Fort
कल्याणपासून १६ किमी अंतरावर असणारा मलंगगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३२०० फुट उंचीवर असुन ट्रेकिंगच्या दृष्टीने अत्यंत कठीण या श्रेणीत मोडतो. किल्ल्याचा डोंगर हाजीमलंग या नावाने ओळखला जातो. गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कठीण असे प्रस्तरारोहण करत जावे लागते. यामुळे निष्णात गिर्यारोहकच गडाच्या माथ्यावर पोहोचू शकतात. सतराव्या शतकात मराठे आणि इंग्रजांमध्ये मोठी लढाई याठिकाणी झाली होती.
किल्ल्यावर काय काय बघाल?
किल्ल्यावर हाजीमलंग दर्गा, पाण्याची टाकी, माची, बुरुज, वाडा, प्रवेशद्वार, तटबंदी इत्यादी अवशेष बघायला मिळतात.
किल्ल्यावरून गोरखगड, चंदेरी, प्रबळगड, पेबचा किल्ला, इरशाळगड आदि किल्ले दिसतात.
कसे पोहोचायचे?
कल्याणजवळील हाजीमलंग या पायथ्याच्या गावातून गडमाथ्यावर जायला अंदाजे ३ तास लागतात.
मुंबई ते मलंगगड हे अंतर ४९ किमी आहे.
८)माणिकगड किल्ला Manikgad Fort
Forts Near Mumbai For Trekking रायगड जिल्ह्यातील माणिकगड हा मुंबईपासून जवळ असणारा एक सुंदर किल्ला आहे. फारशी वर्दळ नसणारा हा किल्ला सह्याद्रीतील एक सुंदर रत्नच आहे. गिरिदुर्ग प्रकारातील माणिकगड किल्ला समुद्रसपाटीपासून २५०० फुट उंचीवर असुन ट्रेकिंगच्या दृष्टीने मध्यम प्रकारात मोडतो.
किल्ल्यावर काय काय बघाल?
गडावर तटबंदी, बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी, गडाचा दरवाजा, चोर दरवाजा, शंकराची पिंड इत्यादी अवशेष बघायला मिळतात.
किल्ल्यावरून प्रबळगड, इरशाळगड, माथेरान, कर्नाळा, सांकशीचा किल्ला हे किल्ले दिसतात.
कसे पोहोचायचे?
खोपोली रसायनी मार्गे जात वडगाव हे गाव लागते. हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वडगावातून किल्ल्यावर पोहोचायला साधारण ३ तास लागतात.
मुंबईहून माणिकगड किल्ला ५९ किमी अंतरावर आहे.
हेही वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले
९)पेबचा किल्ला Peb Fort/ Vikatgad
पेबचा किल्ला उर्फ विकटगड हा किल्ला माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाच्या सानिध्यात असणारा एक सुंदर किल्ला आहे. गिरिदुर्ग प्रकारातला असणारा विकटगड समुद्रसपाटीपासून २१०० फुट उंचीवर असुन ट्रेकिंगच्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
काय बघाल?
किल्ल्यावर एक मोठी गुहा असुन इतरही काही छोट्या गुहा बघायला मिळतात. गडावर तटबंदी, शिडी, हनुमानाचे मंदिर, दत्तमंदिर, महादेव मंदिर, पेबी देवीचे मंदिर, बुरुज, आणि काही पाण्याची टाकी इत्यादी अवशेष बघायला मिळतात.
किल्ल्यावरून चंदेरी, ताहुली, प्रबळगड, मलंगगड हे किल्ले दिसतात.
कसे पोहोचायचे?
नेरळ, पनवेल तसेच माथेरान या तीनही ठिकाणांहून पेबला पोहोचता येते. नेरळ माथेरान घाटातुन डांबरी रस्त्याने जात मध्ये असणाऱ्या रेल्वेरूळाजवळ उतरून तिथुन ट्रेक करत सोप्या वाटेने किल्ल्यावर पोहोचता येते. तसेच नेरळ गावातून जंगलातून जाणाऱ्या वाटा आहेत. पनवेलवरूनही पेबच्या किल्ल्यावर पोहोचता येते. नेरळमधून ३ तास तर पनवेलमार्गे २ तास लागतात. माथेरान नेरळ मार्गे दीड ते दोन तास लागतात.
मुंबईहुन पेबचा किल्ला ८० किमी अंतरावर आहे.
१०)सोनगिरी किल्ला Songiri Fort
महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे तीन किल्ले आहेत. त्यातला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातला सोनगिरी हा एक किल्ला आहे. सोनगिरी किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असुन समुद्रसपाटीपासून २५०० फुट उंचीवर आहे आणि ट्रेकिंगच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. बोरघाटाच्या पायथ्याशी असलेला हा सोनगिरी किल्ला छोटा असला तरी नक्कीच सुंदर अनुभव देणारा आहे. गडमाथा अतिशय छोटा असुन गडावर थोडी तटबंदी, पाण्याचे टाके, आणि वाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात.
सोनगिरी किल्ल्याच्या माथ्यावरून राजमाची, ढाकचा किल्ला, भिवगड आणि प्रबळगड हे किल्ले दिसतात. Forts Near Mumbai For Trekking
कसे पोहोचायचे?
कर्जत जवळ असणारे नावली हे गाव किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. या गावातून किल्ल्यावर जायला साधारण २ तास लागतात. तसेच कर्जत जवळ असणाऱ्या बीड या गावातून देखील किल्ल्यावर जाता येते. यामार्गे किल्ल्यावर जायला दीड तास लागतो.
सोनगिरी किल्ला मुंबईपासून ७२ किमी अंतरावर आहे.
Forts Near Mumbai For Trekking