Rajgad Fort Trek
पुणे जिल्ह्यातील एक आडदांड, बुलंद आणि बळकट असा किल्ला म्हणून किल्ले राजगडाची ओळख आहे. गिरिदुर्ग प्रकारातील असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून १३९४ मीटर उंचीवर असुन ट्रेकिंगच्या दृष्टीने चढाईसाठी मध्यम समजला जातो. राजगड ही शिवाजी महाराजांच्या काळात हिंदवी स्वराज्याची राजधानी होती. राजगडाच्या चारही बाजूंनी नदी आणि टेकड्या लागतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सोयीचे म्हणून शिवरायांनी राजगडाची राजधानी म्हणून निवड केली होती. राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले एकमेकांपासून जवळ असुन राजगड किल्ल्याचा बालेकिल्ला तोरण्याच्या तुलनेत मोठा असल्याने राजगडाची राजकीय केंद्र म्हणून निवड करण्यात आली.
राजगडाची उंची समुद्रसपाटीपासून १३९४ मीटर असुन किल्ल्याला तीन माच्या आहेत. बालेकिल्ला सर्वात उंचावर आहे. पद्मावती माची, संजीवनी माची आणि सुवेळा माची या तीन मोठ्या माच्या राजगडाला आहेत.
राजगड किल्ल्याचा इतिहास History Of Rajgad Fort
पुराणांतील उल्लेखानुसार राजगड किल्ल्याचा डोंगर सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षांपासून ज्ञात आहे. मुरुंबदेव असं राजगडाचं पूर्वीचं नाव होतं. बहामणी राजवटीत राजगडाचं ‘मुरुंबदेव’ असंच नाव होतं. सन १४९० साली राजगड निजामशाहीच्या ताब्यात गेला. त्यानंतर १२५ वर्षे हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. इसवी सन १६२५ मध्ये राजगड आदिलशाहीच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६३० मध्ये राजगड परत निजामशाही कडे गेला. त्यानंतर सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यासोबतच राजगड जिंकून घेतला.
शिवाजी महाराजांनी राजगडच्या बांधणीवर जोराने काम सुरु केले. तिन्ही माच्यांना तटबंदी बांधली. किल्ल्यावर इमारत उभी केली आणि किल्ल्याचे नाव ‘राजगड’ असे ठेवले. तिन्ही माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशी नावं दिली. पुढे १६६० मध्ये शायिस्तेखानाने राजगड जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.
राजगडावर पहाण्याची ठिकाणे Places To Visit At Rajgad
गुंजवणे गावातून किल्ल्यावर जाताना उजव्या बाजूची वाट ही चोर दरवाजाकडे जाते, तर डाव्या बाजूची वाट गुहेकडे जाते. गुहा पाहून परत चोर दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पद्मावती माचीवर पोहोचता येते.
गुंजवणे गावातून किल्ल्यावर जाताना उजव्या बाजूची वाट ही चोर दरवाजाकडे जाते, तर डाव्या बाजूची वाट गुहेकडे जाते. गुहा पाहून परत चोर दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पद्मावती माचीवर पोहोचता येते.
१)पद्मावती माची
राजगडाच्या तिन्ही माच्यांपैकी पद्मावती माची ही एकदम प्रशस्त आहे. ही माची केवळ लष्करी केंद्र नसून स्वराज्यात निवासठिकाणही होते. पद्मावती माचीवर बांधकामाचे बरेच अवशेष सापडतात. माचीवर पद्मावती देवीचे मंदिरही आहे. तसेच सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही बघायला मिळतात. याशिवाय पद्मावती माचीवर स्वराज्यातील अधिकाऱ्यांची घरे देखील आहेत. Rajgad Fort Trek
२)पद्मावती तलाव
गुप्त दरवाजाकडून चढुन पद्मावती माचीवर आल्यावर समोरच पद्मावती तलाव नजरेस पडतो. तलावाच्या भिंती शाबूत असुन आत जाण्यासाठी एक कमान तयार केलेली आहे.
Rajgad Fort Trek
३)पद्मावती मंदिर
पद्मावती माचीवर असलेल्या पद्मावती मंदिराचा अलीकडेच २००२ साली जीर्णोद्धार केला आहे. हे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले असा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिरात तीन मुर्त्या असुन मध्ये पद्मावती देवीची मूर्ती शेंदूर फासलेल्या स्वरुपात बघायला मिळते. या मंदिरात २० ते ३० जणांची राहायची सोय होते. मंदिराच्या बाजूला पाण्याचे टाके असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबाईंची समाधी आहे. Rajgad Fort Trek
४)रामेश्वर मंदिर
पद्मावती देवीच्या मंदिरासमोर पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात हनुमानाची मूर्ती देखील आहे. रामेशवर मंदिरापासून पायर्या वर चढून गेल्यावर पुरातत्व खात्याचे कार्यालय दिसते. या भागात सदर आणि राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
५)राजवाडा
रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर गेल्यावर उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. राजवाड्याच्या मागे तलाव आहे. राजवाड्यापासून थोडेसे पुढे गेल्यावर अंबारखाना आहे. यापुढे सदर असुन अजूनही काही वास्तू आहेत.
६)सदर
सदर ही गडावरची सर्वात महत्वाची वास्तू आहे. पूर्वी इथे ओटीच्या कडेला मधल्या खणात जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. इतिहास तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.
सदरेपासुन पुढे गेल्यावर तीन वाटा लागतात. यातील एक वाट पाली दरवाजाकडे, दुसरी सुवेळा माची तर तिसरी वाट बालेकिल्ल्याकडे जाते. यापैकी उजव्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरल्यावर आपण पाली दरवाजाजवळ पोहोचतो.
Rajgad Fort Trek
७)पाली दरवाजा
पाली दरवाजा मार्ग हा पायथ्याच्या पाली गावातून येतो. हा राजमार्ग असुन फार प्रशस्त आहे. यामार्गे गडावर चढण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार अंबारीसह हत्ती आत येईल इतके उंच आणि रुंद आहे. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मीटर वर गेल्यावर भक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजुने संरक्षणासाठी बुरुज बांधण्यात आलेले आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात. या दरवाजाने गडावर जाताना उजव्या बाजूला एक शिलालेख आहे.
८)बालेकिल्ला
बालेकिल्ला हा राजगडावरील सर्वात उंच भाग आहे. बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता जरासा अवघड आणि अरुंद आहे. इथे चढण्यासाठी लोखंडी रेलिंग लावण्यात आली आहे. वर चढुन गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो, ज्याला महादरवाजा असेही म्हणतात. हा दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. हे प्रवेशद्वार ६ मीटर उंचीचे असुन दरवाजावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी असून काही अंतरावर बुरुजही आहेत. महादरवाजातून आत गेल्यावर समोरच जननी देवीचे मंदिर लागते. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे आहे. याच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर व पाण्याची टाकी आहे. यासोबतच बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील चौथरे, जुन्या वाड्यांचे अवशेष आढळतात.
बालेकिल्ला उतरून खाली आल्यावर सुवेळा माचीकडे जाताना वाटेत डाव्या बाजूला गुंजवणे दरवाजा दिसतो. Rajgad Fort Trek
९)गुंजवणे दरवाजा
गुंजवणे दरवाजाजवळ आपल्याला एकापाठोपाठ तीन प्रवेशद्वार बघायला मिळतात. बाजुने भक्कम बुरुज आहेत. इथे वैशिष्ट्यपूर्ण कमान आहे. हे प्रवेशद्वार शिवपूर्वकालात बांधलेले असावे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात.
गुंजवणे दरवाजाकडून सुवेळा माचीकडे जाताना उजवीकडे एक छोटी टेकडी आहे. तिला डूबा नावाने ओळखले जाते. तिथे काही उध्वस्त वास्तू आणि हनुमानाची मूर्ती बघायला मिळते. पुढे वाट काळेश्वरी बुरुजाकडे जाते.
१०)काळेश्वरी बुरुज
काळेश्वरी बुरुजाकडे जाताना पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे काही मंदिरांचे अवशेष आहेत. एका मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पं आढळतात. पुढे काळेश्वरी बुरुज आहे. बुरुजावर एक समाधी दिसते. येथे एक गुप्त दरवाजा देखील आढळतो. Rajgad Fort Trek
११)सुवेळा माची
ही माची पूर्वेला असल्याने शिवरायांनी हिचे नाव ‘सुवेळा’ असे ठेवले. या माचीच्या दिशेने चालत गेल्यावर एका सदरेचे अवशेष बघायला मिळतात. माचीच्या बाजुने तटबंदी असुन चिलखती बुरुज देखील आहे. पुढे गेल्यावर एक मोठं नेढं बघायला मिळतं. या नेढ्याच्या उजव्या बाजूला गणपती असुन एक गुप्त दरवाजा देखील आहे. याला ‘मढे दरवाजा’ म्हणतात.
सुवेळा माचीच्या तटबंदीला एकुण १७ बुरुज आहेत तर त्यापैकी ७ बुरुज हे चिलखती बुरुज आहेत. तटबंदीत जागोजागी शौचकुपची व्यवस्था केलेली बघायला मिळते.
१२)संजीवनी माची
सुवेळा माची पाहून आल्यावर बालेकिल्ल्याजवळून दुसऱ्या वाटेने संजीवनी माचीकडे जाता येते. संजीवनी माची अडीच किमी लांब आहे. ही माची गडावरील सर्वात मोठी माची आहे. माचीवर प्रत्येक ठिकाणी चिलखती बुरुज आहेत. माचीवर अनेक पाण्याची टाकी दिसतात. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीच्या दोन्ही बाजूला चिलखती तटबंदी बघायला मिळते. दोन्ही तटांमध्ये बऱ्यापैकी रुंदी असुन ६ ते ७ मीटर खोली आहे. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी शौचकुप आढळतात. दोन्ही बाजूला भक्कम बुरुज आहेत.
संजीवनी माची वरुन खाली उतरुन जातांना एक दरवाजा लागतो. या दरवाजावर व्याघ्रमुखाचे शिल्प दिसते. पुढे आळू दरवाजा लागतो. Rajgad Fort Trek
१३)आळु दरवाजा
संजीवनी माचीवर जाण्यासाठी या दरवाज्याने जाता येते. या दरवाजातून उतरून तोरणा किल्ल्याकडे जाता येते. सध्या हा दरवाजा ढासाळलेल्या अवस्थेत आहे.
Rajgad Fort Trek
राजगड किल्ला संपूर्ण आणि व्यवस्थित पाहण्यासाठी साधारणपणे २ दिवस तरी लागतात. गडावरुन तोरणा किल्ला, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर, लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात.
राजगडावर पोहोचण्याच्या वाटा How To Rajgad Fort
१)गुप्त दरवाजामार्गे
वेल्हेच्या अलीकडे वाजेघर या गावी उतरुन तिथुन रेलिंगच्या सहाय्याने गडावर जाता येते. यामार्गे गड चढण्यास ३ तास लागतात.
२)पाली दरवाजामार्गे
पुणे वेल्हे रस्त्याने जाताना डावीकडे आत जाऊन पाली दरवाजा लागतो. यामार्गे पायऱ्या असुन गड चढण्यास ३ तास लागतात. ही वाट सोपी आहे.
३)गुंजवणे दरवाजामार्गे
पुणे ते वेल्हे या रस्त्यावर ‘मार्गासनी’ या गावी उतरून तिथुन गुंजवणे गावात जाता येते. या वाटेवरून गड चढण्यास अडीच तास लागतात. Rajgad Fort Trek
४)अळु दरवाज्यामार्गे
तोरणा किल्ला उतरून या मार्गे राजगड चढता येतो.
५)गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाचीवर
गुंजवणे गावातून जंगलातून एक वाट या दरवाजामार्गे सुवेळा माचीवर येते.
हेही वाचा- Easy Beginner Treks near Pune Marathi ट्रेकिंग सुरु करायचंय? मग हे आहेत पुण्याजवळचे काही सोपे किल्ले
राजगडावर राहण्याची/खाण्याची सोय Stay and Food Facility At Rajgad
पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते. तसेच पद्मावती माचीवर राहण्यासाठी पर्यटक निवास खोल्या आहेत. राजगडावर सध्यातरी राहायला परवानगी आहे. पद्मावती माचीवर तंबू ठोकून देखील लोक राहू शकतात. तसेच खाली पायथ्याच्या गुंजवणे गावात असलेल्या मंदिरात २५-३० लोकांची राहायची सोय होऊ शकते. गुंजवणे आणि पाली दोन्ही बाजूंनी खाली गावात गाडी पार्किंगची सोय आहे.
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी. किंवा पायथ्याशी गावात होते.
पद्मावती मंदिराच्या समोर असलेल्या टाक्यात पिण्याचे पाणी आहे.
Rajgad Fort Trek